Water In Winters : हिवाळा (Winter Season) ऋतू जसजसा सुरु झाला आहे. हवेत गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्या कारणाने अनेकजण कमी पाणी पितात. यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ लागते. शरीरात निर्जलीकरण होऊ लागल्याने अनेक आजार होऊ लागतात. अशा वेळी हवामान कोणतेही असो, शरीरात पाण्याची (Water) कमतरता भासता कामा नये. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि आपल्या शरीरातील घाण काढून टाकते. शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने गंभीर मानसिक आजारही (Mental Health) होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूचे किती नुकसान होऊ शकते तसेच कोणत्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
'या' गंभीर मानसिक आजारांची शक्यता
डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो
तज्ज्ञांच्या मते, कमी पाणी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण कमी पाणी प्यायल्याने शरीरातील हायड्रेशन पातळी कमी होते आणि डोकेदुखीसारख्या समस्या वाढतात. त्यामुळे सतत पाणी पीत राहावे.
स्मरणशक्ती कमकुवत होईल
हिवाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. अशा वेळी स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. यामुळे गोष्टी लवकर विसरण्याची समस्या उद्भवू शकते.
ब्रेन स्ट्रोकचा धोका
डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो, ज्याची एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात. यापैकी एक म्हणजे कमी पाणी पिणे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या वातावरणात लोकांना तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, निर्जलीकरणामुळे मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा धोका सर्वात जास्त असतो.
दररोज किती पाणी प्यावं?
अनेकदा लोकांना असे वाटते की, उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात कमी पाणी प्यावं. पण, तज्ञ या गोष्टीला समर्थन देत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तर, उन्हाळ्यात दररोज 7-8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.