Health Tips : मधुमेह (Diabetes) हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. हा आजार लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मधुमेहाचा आजार होण्यामागे प्रामुख्याने खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेली लाईफस्टाईल ही प्रमुख कारणं आहेत. स्वादुपिंडात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे उद्भवणाऱ्या या आरोग्याच्या समस्येमध्ये आहाराची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना अनेकदा उच्च आणि कमी रक्तातील साखरेची पातळी या समस्येचा सामना करावा लागतो. जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला, चांगला आहार घेतला तर बऱ्याच अंशी मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. 


रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असल्याने, मधुमेही रुग्णाला अंधुक दृष्टीपासून ते किडनी आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजारांपर्यंतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. स्ट्रोकचा धोका मधुमेहामध्येही मोठ्या प्रमाणात वाढतो. यासाठीच आहारात सकस पदार्थांचा समावेश करणे आणि रोजच्या खाण्यापिण्याची दिनचर्या पाळणे अत्यंत आवश्यक आहे.


नाश्ता करण्यापूर्वी 'हे' काम करा


मधुमेही रुग्णांनी सकाळी एकदा आपल्या रक्तातील साखरेची चाचणी करावी. जेणेकरुन तुमच्या शरीराला कोणतं अन्न चांगलं आहे तसेच शरीराला इन्सुलिनची गरज आहे की नाही हे कळेल. सकाळी 7 ते 8 या वेळेत फायबर, प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सने युक्त नाश्ता करा. यामध्ये तुम्ही बेरीज, एक अंडे, क्रीम नसलेले दूध आणि मोड आलेले कडधान्य यांसारख्या गोष्टींचा समावेश करू शकता.


रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी?


अन्नामध्ये कोणतेही अंतर नसावे


मधुमेही रुग्णांनी जेवणात जास्त अंतर ठेवू नये आणि मधूनच आरोग्यदायी स्नॅक्स घेत राहावे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फळे, ड्रायफ्रूट्स, लिंबूपाणी यांसारख्या गोष्टी घ्या. तसेच, संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान, तुम्ही भाज्यांचं सूप, एक सफरचंद किंवा बिनसाखरेचा चहा आणि घेऊ शकता.


दुपारचा आहार कसा असावा?


मधुमेहामध्ये दुपारचे जेवण 1 ते 1:30 च्या दरम्यान घेणे चांगले आहे. यामध्ये गव्हाच्या ऐवजी मिक्स पिठाची भाकरी घ्यावी. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती कमी होते. दुपारच्या जेवणात भाज्यांची कोशिंबीर, दही, मसूर, हिरव्या भाज्यांचा समावेश करा.


रात्रीच्या जेवणाची वेळ योग्य ठेवा


मधुमेहामध्ये, बहुतेक लोक रात्रीच्या वेळी रक्तातील साखर वाढण्याची तक्रार करतात, म्हणून रात्रीचे जेवण संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान घेतले पाहिजे, जेणेकरून अन्न पचण्यास योग्य वेळ मिळेल. तसेच अन्नामध्ये फायबर आणि प्रथिने युक्त गोष्टींचा समावेश करा. कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ टाळा, हलका आहार घ्या. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ चालत राहा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी