Health Tips : सध्या महाराष्ट्रासह काही राज्यांत परतीचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे (Rain) हवामानात बरेच बदल होत असून या अवकाळी पावसाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसून येत आहे. हॉस्पिटलमध्येदेखील फ्लू, ताप, टायफॉईड, डायरिया रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात खूप दमट हवामान असते. त्यामुळे या ऋतूत संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार जास्त असतात. त्यामुळे नागरिकांनी आहाराची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. हृदय आणि मधुमेहाच्या रूग्णांनीही यावेळी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. रूग्णांनी आपले शरीर हायड्रेटेड ठेवावे. पिण्याच्या पाण्याबरोबरच भरपूर पाणी असलेली फळेही खावीत. या ऋतूत नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करावे या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
या ऋतूत काय खावे?
1. ड्रायफ्रूट्स :
या ऋतूत ड्रायफ्रूट्स खाणे कधीही चांगले आहे. ड्रायफ्रूट रोगप्रतिकारशक्ती वाढवितात. या व्यतिरिक्त यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्व. खनिजं अशी अनेक पोषक घटक असतात.
2. हर्बल टी :
पावसाळ्यात चहा पिणं कधीही चांगलंच. मात्र, चहाच्या जागी जर तुम्ही हर्बल टी चा वापर केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. तसेच, पावसाळ्यात बॅक्टेरियामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच, हर्बल टी मध्ये अॅंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
3. गरम पाणी प्या :
पावसाळ्यात गरम पाण्याचे सेवन फार उपयोगी मानले जाते. पावसाळ्यात नाकातून रक्त वाहणे, नाक चोंदणे यांसारखी सामान्य लक्षणं दिसतात. यावर गरम पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय आहे.
4. कडधान्य खा :
कडधान्यात जीवनसत्त्व, खनिजे, फायबर आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. यामुळे शरीरात बराच काळ ऊर्जाही टिकून राहते. कडधान्यामुळे कॅन्सर आणि हृदयाच्या समस्याही कमी होतात.
5. हिरव्या पालेभाज्या खा :
हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन, आणि भरपूर जीवनसत्त्व असतात. अनेकदा डॉक्टरांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. याचं कारण यामुळे शरीरात अधिक काळ ऊर्जा टिकून राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :