Blood Sugar : रक्तातील साखरेची पातळी वाढणे हे खरंतर आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने प्री-डायबेटीक (Pre-Diabetic) किंवा मधुमेह (Diabetes) यांसारखी लक्षणं शरीरात दिसू लागतात. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी ही रक्तातील साखरेची पातळी सतत नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. पण, तुमच्या जीवनशैलीतील काही सवयी यामध्ये अडथळा ठरू शकतात. या कारणास्तव, या सवयी बदलणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण कसे टाळता येईल ते जाणून घेऊयात.


ब्लड शुगर म्हणजे काय?


आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा आपल्याला कार्बोहायड्रेट्सपासून मिळते. कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लुकोज असते. रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. या कारणामुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रक्तातील साखरेची सामान्य रेंज 70mg/dL ते 100mg/dL उपवासा दरम्यान आणि जेवणानंतर 2 तासांनी 140mg/dL पेक्षा कमी असावी. रक्तातील साखरेची पातळी वाढण्याच्या समस्येला हायपरग्लायसेमिया म्हणतात. 


रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून कसे थांबवता येईल?


व्यायाम करा


रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शारीरिक हालचाल न करणे. व्यायाम करताना, तुमचे शरीर ग्लुकोज वापरते, जे रक्तातील साखरेची पातळी राखते. याशिवाय व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त फॅटही कमी होते, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही व्यायाम फायदेशीर आहे. त्यामुळे रोज काही वेळ योगा करा.


आहाराची काळजी घ्या


आहाराचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेवर होतो. अधिक प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखर आणि मीठ असलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्यामुळे हिरव्या भाज्या, फळे, दही, संपूर्ण धान्य इत्यादींचा आहारात समावेश करा. तसेच, तुमच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण नियंत्रित ठेवा. 


फायबरचे सेवन वाढवा


अन्नातील फायबरचे प्रमाण वाढवून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. फायबर हळूहळू पचते, ज्यामुळे रक्तातील साखरेची वाढ होत नाही. याशिवाय फायबर पचनासाठीही फायदेशीर आहे. याशिवाय, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.


तणाव कमी करा


दैनंदिन जीवनातील वाढत चाललेला ताण यामुळे आपण तणावाला बळी होऊ शकतो. तणावामुळे आपले शरीर कॉर्टिसॉल सोडते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे तणाव कमी करा. 


पुरेशी झोप घ्या


झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते आणि स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल देखील बाहेर पडतो. म्हणून, दररोज 7-8 तास पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं