Sugar consumption:वजन कमी करायचे असो वा मधूमेहाचा रुग्ण असो 'तुम्ही साखर सोडा' असा सल्ला हमखास आलाच म्हणून समजा. मग उद्यापासून साखर बंद अशी घोषणा करून अनेकजण अचानक साखर सोडतात आणि डोके दुखणे, थकल्यासारखं वाटू लागलं, अस्वस्थ वाटू लागले म्हणत गोडाचा एखादा पदार्थ हळूच तोंडातही जातो. तज्ञांच्या मते, अचानक कोणतीही गोष्ट सोडल्यानं शरिरात काही बदल घडतातच. त्या बदलांना पचवण्यासाठी शरिरालाही वेळ द्यावा लागतो. हीच गोष्ट सारखेच्या बाबतीतही लागू होते असं डॉक्टर सांगतात.
सकाळी उठल्यापासून आपल्या शरिराला साखरेची सवय असते. ही सवय मधुमेही, लठ्ठपणासह हृदयरोग्यांसाठीही घातकच असल्याचं सांगण्यात येतं. साखरेतील कर्बोदके हा आपल्या शरिरासाठी ऊर्जेचा स्रोत असला तरी आपल्या रक्तीतील सारखरेची पातळीही यानं वाढते. त्यात अनेकजण दुधातून साखर घेतात. चहा, कॉफीतही साखर असतेच. त्यामुळं अनावश्यक फॅट शरिरात साचू लागतात. डायबिटिज किंवा हृदयाच्या निगडीत समस्या असतील तर, साखर खाणे टाळा असे अनेक तज्ज्ञ सांगतात. पण अचानक साखर सोडल्यानं शरिरात काही बदल दिसू शकतात. पहिले काही दिवस साखर सोडल्यानं उदासी, थकवा, डोकं दुखणं असे ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार बदल दिसू शकतात.
अचानक साखर सोडल्यानं जाणवेल थकवा
अचानक साखर सोडली असेल तर अनेकांना पहिले दोन तीन दिवस थकवा जाणवल्याच्या तक्रारी येताना दिसतात. निरुत्साही आणि ऊर्जा नसल्यासारखेही वाटू शकते. अशा वेळी साखरेऐवजी फळं किंवा एखादा खजूर खाण्याचा सल्ला देण्यात येतो.
अनेकांना डोकेदुखीचा होतो त्रास
दररोज साखर खाण्याची सवय असेल तर अनेकांना बारीक डोकेदुखीची कुरबुर जाणवते. सकाळचा चहा सोडल्यानंतरही अनेकांना हा त्रास होतो. जसे व्यायामाच्या पहिल्या दिवशी सगळे अंग दुखते तसाच हा त्रास असतो. जर साखरेचं अतिसेवन करत असाल तर अचानक साखर सोडल्यानं शरिराला हा बदल पचवणे जड जाते. यासाठी अचानक पूर्ण साखर बंद करण्यापेक्षा साखरेचं प्रमाण कमी करत करत हळूहळू साखर बंद केली तर नैसर्गिकरित्या शरिराला सारखेची कमतरता भरता येते.
मूडस्विंग्स वाढतात
साखर अचानक बंद केल्यानं आपल्या मूडस्विंग्सवर परिणाम होतात. अनेकांना चिडचिड, उदास वाटणे असे वाटू शकते.
साखर बंद केल्यानं वजन होते कमी
साखर बंद केल्यानं शरिरात कॅलरीजचे अनावश्यक प्रमाण घटून वजन कमी होते.
साखर बंद केल्याचे दूरगामी चांगलेच परिणाम होतात असे तज्ञ सांगतात. त्यामुळे लठ्ठपणा किवा फॅटलॉस करायचा असेल तर साखरेचे सेवन न केल्यास लक्षणीय बदल दिसतात.
रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रीत राहतं.
साखर बंद केल्यानं रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्यानं कमी होते आणि त्यानंतर नियंत्रणात राहते. परिणामी दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.