Non-alcoholic fatty liver : अति मद्यपान केल्याने यकृत खराब होण्याचा धोका वाढतो. हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? की लठ्ठपणा आणि टाइप-2 मधुमेहामुळेही यकृताचे नुकसान होऊ शकते? होय, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमुळे अल्कोहोलचे सेवन न करताही तुमच्या यकृत संबधित समस्या निर्माण होऊ शकतात. हा आजार प्रामुख्याने बदलती जीवनशैली, तुमच्या खाण्याच्या सवयी आणि खराब दिनचर्येशी संबंधित आहे, ज्याची टक्केवारी भारतीय लोकसंख्येमध्येही वाढत आहे. जाणून घेऊया नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराबद्दल.. ज्याबद्दल माहिती दिलीय मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. अभिजीत बोरसे यांनी..


 


जगभरातील लाखो लोकांना या आजाराने ग्रासले 


नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा एक हळुहळू  फैलावत जाणारा साथीचा आजार (सायलेंट एपिडेमिक) असून जगभरातील लाखो लोकांना या आजाराने ग्रासले आहे. एके काळी हा फक्त यकृताचा आजार समजला जायचा. पण अलीकडे झालेल्या संशोधनात एनएएफएलडी आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांना होणाऱ्या आजारामध्ये दुवा असल्याचे आढळून आले आहे. यातून या दोन एकदम वेगळ्या आजारांमध्ये असलेल्या परस्परसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे.


 


हा आजार कसा होतो?


एनएएफएलडीमध्ये यकृतावर अतिरिक्त चरबी जमा होते. त्याचा संबंध बरेचदा लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिबंध, मेटाबोलिक सिन्ड्रोम या आजारांशी जोडला जातो. पण त्याचा परिणाम केवळ यकृतापुरताच मर्यादित राहत नाही तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या यंत्रणांपर्यंत तो पोहोचतो, त्यामुळे तो घातक ठरू शकतो. अनेक आरोग्य यंत्रणांनी एनएएफएलडी आणि हृदय तसेच रक्तवाहिन्यांना असलेल्या धोक्यामधील संबंधाला दुजोरा दिला आहे. एनएएफलडीमुळे इन्सुलिन प्रतिबंध निर्माण होतो. त्यामुळे चयापचयाशी संबंधित नियंत्रणावर छोटे छोटे परिणाम होऊ लागतात. यात डिस्लिपिडेमिया, इन्फ्लेमेशन, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यांचा समावेश होतो. या सगळ्याचे रुपांतर अथेरोस्क्लेरोसिसमध्ये होते, जे कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांच्या मूळाशी असलेले एक कारण आहे. 



शरीरातील चरबी ठरते कारणीभूत


या सोबतच एनएएफएलडी आजाराचा मुख्य आतड्यांवर मोठ्या प्रमाणावर चरबी साठण्याशी अत्यंत जवळचा संबध आहे. यात शरीरातील अवयवांभोवती घातक चरबी साठत जाते. त्यानंतर सिस्टेमिक इन्फ्लेमेशन आणि इन्सुलिनला प्रतिबंध होतो. त्यामुळे हृदयविकारांची आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित धोका वाढतो. त्याचप्रमाणे  एनएएफएलडीशी संबंधित डिस्लिपिडेमियाही होतो.  वाढलेले ट्रायग्लिसराइड्स आणि हायडेन्सिटी लायपोप्रोटिन (एचडीएल) कोलेस्टरॉलचे कमी झालेले प्रमाण यामुळे अथेरोस्क्लेरॉसिसचा आजार विकोपाला जातो आणि त्यामुळे प्लाक तयार होण्याचा वेग वाढतो.


 


हृदय तसेच रक्तवाहिनीच्या आजारामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ


डॉक्टर सांगतात.. अनेक नव्या पुराव्यांमधून असेही सूचित होते की, एनएएफएलडीमुळे, अनुवांशिक घटक नसूनही याचा हृदय आणि रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतो, अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, एनएएफएलडी असलेल्या रुग्णांच्या हृदयातील स्नायूंमध्ये रक्ताची गुठळी होणे (मायोकार्डिअल इन्फार्क्शन), स्ट्रोक आणि हृदय तसेच रक्तवाहिनीच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यातून या दोन घटकांमधील दुव्याचे गांभीर्य दिसून येते. एनएएफएलडी आणि सीव्हीडीमध्ये काही समान जोखीम घटक आहेत. उदा. लठ्ठपण, मधुमेह, हायपरटेन्शन आणि डिस्लिपिडेमिया. यामुळे त्यांच्यातील पॅथोफिजिओलॉजीमधील (आजाराशी संबंधित शारीरिक प्रक्रियांमध्ये झालेला बिघाड) गुंफण अजून वाढते आणि चयापचयातील बिघाड तसेच हृदय, रक्तवाहिन्यांमधील आजार यांचे दुष्टचक्र सुरू होते.


 


आशेचा किरण...आजारावर 'असा' ताबा मिळवता येऊ शकतो



पण, या अंधःकारात एक आशेचा किरण आहे. आहारावर नियंत्रण, नियमित व्यायाम आणि वजन कमी करणे अशा जीवनशैलीतील बदलांमुळे एनएएफएलडी आणि हृदय तसेच रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांवर ताबा मिळविण्यासाठी मदत होते. इन्सुलिन सेन्सिटायझर्स आणि लिपिड-लोअरिंग एजंटसारख्या फार्माकोथेरपीच्या माध्यमातून चयापचयाशी संबंधित विकृतींवर उपाय केल्याने एनएएफएलडी असलेल्या रुग्णांना हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित लाभ होतो. त्याचप्रमाणे वेळेवर निदान आणि एनएएफएलडीवरील सर्वंकष उपचारांमध्ये त्याच्या हृदय तसेच रक्तवाहिन्यांवर होणाऱ्या परिणामांना आळा घालणे शक्य आहे. एनएएफएलडीचे नियमित तपासणी, विशेषतः उच्च-जोखीम असलेल्या लोकांनी ही तपासणी नियमित करणे आणि जोखीम घटकांना आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलल्यास सीव्हीडीला प्रतिबंध किंवा विलंब केला जाऊ शकतो. परिणामी त्यामुळे येणारे व्यंग आणि मृत्यू रोखले जाऊ शकतात.


 


हा केवळ यकृताला होणारा आजार नाही..


एनएएफलडी आणि हृदय व रक्तवाहिन्यांना असलेल्या धोक्याचा संबंध हा केवळ एक योगायोग नाही, तर चयापचयातील बिघाड आणि दाह निर्माण करणारे मार्ग यातील गुंतागुंतीची परस्परक्रिया प्रतिबिंबीत करते. एनएएफएलडी हा केवळ यकृताला होणारा आजार नाही, याची दखल घेणे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे हृदय तसेच रक्तवाहिन्यांच्या आजाराला प्रतिबंध आणि उपचार याबाबतीत असलेल्या आपल्या दृष्टिकोनात बदल घडवून आणते. एनएएफएलडीची योग्य चाचणी करून  हृदय तसेच रक्तवाहिन्यांच्या आजारामुळे येणारे व्यंग तसेच मृत्यू यांची लाट थोपवता येऊ शकते आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी एक निरोगी भविष्य घडवता येऊ शकते.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Health : 'या' प्रमुख कारणामुळे 30-40 वयोगटातील 80 टक्के जोडप्यांना गर्भधारणा होईना! तज्ज्ञांनी दिला 'हा' इशारा