C-Section : अनेकदा नॉर्मल प्रसुती (Normal Delivery) करण्यात काही अडचणी आल्या तर आई आणि बाळाच्या सुरक्षितेसाठी सी-सेक्शन डिलीव्हरी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण गरज नसतानाही बऱ्याच वेळा सी-सेक्शन प्रसूती केली जातेय. आणि भारतात याचे प्रमाण अधिक वाढत असल्याची चिंताजनक माहिती एका नवीन संशोधनातून समोर आली आहे. अशा प्रकारच्या प्रसूती मुळे खासगी रुग्णालये चांगली कमाई करत असल्याची काही प्रकरणे देखील समोर आली आहेत.  भारतात सी-सेक्शन प्रसूतीची प्रकरणे वाढत असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सी-सेक्शन प्रसूतीचे प्रमाण अधिक आहे.



खासगी रुग्णालयातच सी-सेक्शन प्रसूतीच्या शक्यतेत वाढ का?



इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रासने आपल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की देशात 2016 ते 2021 दरम्यान सिझेरियन सेक्शनची प्रकरणे वाढली आहेत. हे थोडे चिंताजनक आहे कारण गर्भधारणेदरम्यानच्या गुंतागुंत कमी झाल्या असल्या तरी सिझेरियनच्या केसेसमध्ये वाढ होत आहे. एका खासगी रुग्णालयात महिलेची प्रसूती होत असताना सी-सेक्शनद्वारे प्रसूती होण्याची शक्यता वाढते, असे या अभ्यासातून समोर आले आहे. प्रसूतीदरम्यान सी-सेक्शनची शक्यता जास्त वजन असलेल्या आणि वृद्ध महिलांमध्ये (35-49 वर्षे) वाढते, असेही सांगण्यात आले. आयआयटी मद्रासच्या मानवता आणि सामाजिक विज्ञान विभागाने तमिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये हे संशोधन केले. संशोधकांमध्ये वर्षानी नीती मोहन आणि पी. शिरीशा, संशोधन अभ्यासक गिरिजा वैद्यनाथन आणि संस्थेचे प्राध्यापक व्ही.आर. मुरलीधरन यांचा समावेश होता. संशोधनाचे निकाल बीएमसी प्रेग्नन्सी अँड चाइल्डबर्थ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.


 


कोणत्याही गरजेशिवाय होतेय सी-सेक्शन प्रसूती?


सी-सेक्शन प्रसुती ही एक शस्त्रक्रिया आहे जी सहसा आई आणि न जन्मलेल्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी केली जाते. अशावेळी अनावश्यक सी-सेक्शन प्रसूतीचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात आणि प्रसूतीची किंमत देखील वाढते. संशोधक प्रा. मुरलीधरन म्हणाले, 'संशोधनातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे प्रसूतीचे ठिकाण, अशावेळी खाजगी रुग्णालयात याचे प्रमाण अधिक वाढल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयात सर्जिकल डिलिव्हरी कोणत्याही गरजेशिवाय झाल्याचंही दिसून आलंय.


 


पाच वर्षांत सी-सेक्शन प्रसुतीचे प्रमाण वाढले


संशोधनातून असे दिसून आले की संपूर्ण भारत आणि छत्तीसगडमध्ये, दारिद्र्यरेषेवरील लोक सी-सेक्शनची निवड करतात, तर तामिळनाडूमध्ये प्रकरण पूर्णपणे वेगळे होते. येथे गरीब लोक खाजगी रुग्णालयात सी-सेक्शन घेण्याची शक्यता जास्त होती. 2016 पूर्वी, भारतात सी-सेक्शन 17.2% होते, परंतु 2021 पर्यंत पाच वर्षांत ते 21.5% पर्यंत वाढले आहे. खाजगी क्षेत्रातील हा आकडा 43.1% (2016) आणि 49.7% (2021) होता. याचाच अर्थ खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्येक दोन प्रसूतीपैकी एक प्रसूती सी-सेक्शनद्वारे झाली आहे.


 


जागतिक आरोग्य संघटना (WHO) काय म्हणते?


प्रसूतीबाबत, जागतिक आरोग्य संघटना सुचवते की केवळ 10% ते 25% प्रसूती सी-सेक्शनद्वारे होऊ शकतात. आयआयटी मद्रासच्या संशोधनात असे म्हटले आहे की सी-सेक्शन डिलिव्हरी वाढण्याची अनेक कारणे आहेत. शहरांमध्ये राहणाऱ्या सुशिक्षित महिलांना सी-सेक्शन प्रसूती होण्याची शक्यता जास्त असते कारण त्या स्वतःचे निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना चांगल्या आरोग्य सुविधाही मिळतात.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health : नेमकी किती असावी Perfect Waist Size? तुमच्या उंचीनुसार स्त्री-पुरूषांचे कंबरेचे योग्य माप जाणून घ्या