इश्क़ वह बला है, जिसको छुआ इसने वह जला है,
दिल से होता है शुरू, पर कमबख्त सर पे चढ़ा है,
कभी खुद से कभी खुदा से, कभी ज़माने से लड़ा है,
इतना हुआ बदनाम फिर भी, हर जुबां पे ऐडा है!

या बॉलिवूडच्या गाण्याची आतापर्यंत अनेकांना प्रचिती आलीच असेल...आज व्हॅलेंटाईन डे. बघता बघता तो क्षण आलाच ज्याची वाट अनेकजण, अनेक दिवस वा महिन्यांपासूनही पाहत असतील. आजचा दिवस हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा दिवस.


तसं पाहता प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही एका ठराविक वेळ अथवा दिवसाची गरज नसते. त्यासाठी वर्षाचे सर्वच दिवस अपूरे पडतील. पण व्हॅलेंटाईन डे ची गोष्टच काही वेगळी आणि खास आहे. या दिवसाची आतुरतेने अनेकजण वाट पाहत असतात. तसंही आजच्या दिवशी आपले प्रेम व्यक्त करणे हे सुरक्षित असू शकते, त्यामध्ये वाद होण्याचा धोकाही कमी असतो ही शक्यता लक्षात घेऊन अनेक प्रेमवीर आज ठरवून धाडस करतात.


पण व्हॅलेंटाईन डे साजरा करताना त्याचा इतिहास, म्हणजे तो का सुरु झाला किंवा कधी सुरु झाला याचीही माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. आज साजरा करण्यात येणारा व्हॅलेंटाईन डे हा एका प्रेमाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रेमवीराच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातोय हे सांगितल्यास अनेकांना आश्चर्य वाटेल.


साधारणपणे आजपासून 1700 वर्षापूर्वी, तिसऱ्या शतकात रोममध्ये व्हॅलेंटाईन नावाचा एक सेन्ट अर्थात संत होऊन गेला. त्यावेळी रोममध्ये क्लॉडियस दुसरा या राजाचे राज्य होतं. या राजाला जग जिंकण्याची मनिषा होती. त्यामुळे सतत युद्ध करणे हा याचा छंद होता किंवा सवय होती असे आपण म्हणू शकतो.


Happy Kiss Day 2021: गुज ओठांनी ओठांना सांगायचं...


क्लॉडियसला एक लक्षात आले की लग्न न झालेले सैनिक हे लग्न झालेल्या सैनिकांपेक्षा अधिक धाडसी असतात, शूर असतात. त्यावेळी त्यानं एक फर्मान काढलं. आपल्या राज्यात आता लग्न करण्याला, प्रेम करायला बंदी आहे असं त्यात लिहलं होतं. तसंच प्रेम करणाऱ्यांचाही त्याला राग यायचा.


त्याच राज्यात हा व्हॅलेंटाईन नावाचा संत राहायचा. प्रेम करणाऱ्या तरुणांचे तो गुप्तपणे लग्न लावायचा. याची खबर क्लॉडियसला लागताच त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकले. क्लॉडियलच्या मते, हा भयंकर गुन्हा होता. पुढे तुरुंगात असताना व्हॅलेंटाईनचा जीव तुरुंग अधिकाऱ्याच्या मुलीवर आला, त्यांचे प्रेम जुळले. याची माहिती लागताच खवळलेल्या क्लॉडियसने व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा देण्याचे फर्मान काढले. व्हॅलेंटाईनला 14 फेब्रुवारी या दिवशी फाशी देण्यात आली.


फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने त्याच्या प्रियसीला पत्र लिहिले आणि त्या पत्राचा शेवट 'युवर व्हॅलेंटाईन' असा केला होता. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात चर्चच्या एका संताने व्हॅलेंटाइनने प्रेमासाठी दिलेल्या बलिदानाची दखल घेतली आणि त्याच्या फाशीचा दिवस व्हॅलेंटाईन डे च्या स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो असं सांगण्यात येतंय.


या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून आपले प्रेम व्यक्त करतात. भारतात हा दिवस साजरा अलिकडे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय. म्हणजे जागतिकीकरणाच्या नंतर काही प्रमाणात सुरुवात झालेल्या दिवसाला आज हळूहळू सामाजिक मान्यता मिळत आहे.


पण अनेक कट्टर धार्मिक संघटनांचा आजही अशा प्रकारचा कोणता दिवस साजरा करायला विरोध आहे. हे भारतीय संस्कृतीवरचं आक्रमण आहे असं सांगून काही धार्मिक संघटना आजच्या दिवशी प्रेमीयुगुलांना हा दिवस साजरा करण्याला विरोध करतात.


पण 'प्यार किया तो डरना क्या' हा विचार करुन प्रेमवीर अशा अनेक क्लॉडियसवर मात करतात. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आज आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईनचे बलिदान वाया जाऊ देऊ नका आणि आजची सुवर्णसंधी सोडू नका.


Hug Day 2021: सांग तिला, तुझ्या मिठीत आहे जग सारा.....