नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये हात धुण्यासाठी लिक्विड हॅण्ड सॅनिटायझरचा वापर कमालीचा वाढला आहे. तरुणांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती हात धुण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतात. मात्र, हे हॅण्ड सॅनिटायझर तुम्हाला फायदेशीर ठरण्यापेक्षा हानीकारक अधिक ठरु शकतं. एका नव्या रिसर्चमध्ये याच्या वापराचे दुष्परिणाम समोर आले आहे.
या नव्या संशोधनानुसार, अलकोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करण्याने मुलांना अनेक आजार संभवतात. यात प्रमुख्याने पोटदुखी, मळमळणे आणि ओमेटिंगसारखे त्रास मुलांना होऊ शकतात. तसेच याच्या अतिरिक्त वापरामुळे मुलं कोमात जाण्याचा धोका अधिक संभवतो, असं संशोधनकर्त्यांचं म्हणणं आहे.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनने (CDCP) यावर रिसर्च केलं आहे. या संशोधनाअंती हॅण्ड सॅनिटायझरच्या संपर्कात मुलांना गंभीर आजार संभवतात, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या संशोधनासाठी अमेरिकेतल्या सीडीसी सेंटरने 2011 ते 2014 या काळात 12 वर्षापर्यंतच्या 70,669 मुलांचं निरिक्षण केलं. या निरिक्षणामध्ये 92 टक्के मुलं ही अल्कोहोलिक हॅण्ड सॅनिटायरचा वापर करतात, तर 8 टक्केच मुलं ही अल्कोहोल विरहित सॅनिटायरचा वापर करत असल्याचं आढळून आलं.
विशेष म्हणजे, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याच्या वापराचे दुष्परिणाम संभवत असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अल्कोहोलिक उत्पादनं मुलांना वापरासाठी देणं टाळावं, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.