क्रिकेट : 2018 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संमिश्र यशाचं
2018 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संमिश्र यशाचे ठरले आहे. भारतात झालेल्या मालिकांमध्ये टीम इंडियाने भरभरुन यश मिळवले. पण वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर इंग्लंड़ दौऱ्यात भारताला समाधानकारक कामगिरी बजावता आली नाही. यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारतानं अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजसारख्या दुबळ्या संघांवर वर्चस्व गाजवलं. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 आणि इंग्लंडविरुद्ध 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडियानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. वन डेत 12 पैकी 9 सामने भारतानं जिंकले. तर ट्वेन्टी ट्वेन्टीत 13 पैकी 9 सामन्यांत टीम इंडिया विजयी झाली.
कोहलीकडून अनेक विक्रमांना गवसणी
या वर्षात भारताचा कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली. वन डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. तर कसोटीत सर्वात जलद २५ शतके ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही विराटने मिळवला. याशिवाय महेंद्रसिंग धोनीनेही वन डेत दहा हजार धावांचा टप्पा पार केला.
कुस्ती : बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटने इतिहास घडवला
बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या दोन पैलवानांनी 2018 या वर्षात नवा इतिहास घडवला. त्या दोघांनीही ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकलेच, तसेच इंडोनेशियातल्या जाकार्ता एशियाडमध्येही त्या दोघांनी सोनेरी यश खेचून आणले. विनेशला दुखापतीमुळे यंदाच्या जागतिक कुस्ती स्पर्धेला मुकावे लगाले. पण बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करून यंदाच्या वर्षात तिहेरी यश संपादन केले. महिला पैलवान पूजा ढांढानंही यंदाच्य़ा वर्षात लक्ष वेधून घेतले. तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि जागतिक कुस्तीत कांस्य अशी दोन पदकं पटकावली. पैलवान सुशीलकुमार आणि साक्षी मलिक यांच्यासाठी 2018 हे वर्ष निराशादायी ठरले.
टेनिस : लिअँडर पेसला पर्याय कोण?
लिअँडर पेसने यंदा वयाच्या ४५ व्या वर्षी जिंकलेल्या विजेतेपदांनी इतक्यात तरी त्याचा निवृत्त होण्याचा इरादा नसल्याचे स्पष्ट झाले. पेसची ही कामगिरी डोळे विस्फारायला लावणारी असली तरी याच कामगिरीने भारतीय टेनिसमध्ये आज गुणवत्तेची उणीव असल्याचंही दाखवून दिलं. सानिया मिर्झा गरोदर असल्यामुळे यंदा स्पर्धात्मक टेनिसपासून दूरच राहिली. सानियाने तीस ऑक्टोबरला मुलाला जन्म दिला असून, ती पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे. सानियाच्या अनुपस्थितीत अंकिता रैना आणि कारमन कौर थांडी यांनी उज्ज्वल भवितव्याची चुणूक दाखवली आहे.
बॅडमिंटन : सिंधूने अंतिम फेरीतल्या आजवरच्या अपयशाचा डाग पुसला
भारताच्या पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सचे सुवर्णपदक जिंकून, अंतिम फेरीतल्या तिच्या आजवरच्या अपयशाचा डाग पुसून काढला. तिला याआधी पाच मोठ्या स्पर्धांमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागलं होते. त्यामुळं सिंधू अंतिम फेरीत गडबडते, अशी तिच्यावर टीका होत होती. पण तिने वर्ल्ड टूर फायनल्सचे सुवर्णपदक पटकावून, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या सायना नेहवालनंही कारकीर्दीतल्या दुसऱ्या डावात लक्षवेधक कामगिरी बजावली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ती सुवर्णपदकाची, तर जाकार्ता एशियाडमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरली. सायना नेहवालच्या वैयक्तिक आयुष्यात 2018 हे वर्ष नव्या प्रवासाची सुरुवात करणारे ठरले. सायना तिचा मित्र आणि बॅडमिंटनवीर पारुपल्ली कश्यपशी विवाहबद्ध झाली. 2017 हे वर्ष गाजवणारा किदम्बी श्रीकांत यावर्षी त्याच्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या रौप्यपदकाच्या पलीकडे श्रीकांतला मोठं यश मिळवता आलं नाही. लक्ष्य सेनने आशियाई ज्युनियर, यूथ ऑलिम्पिक आणि जागतिक ज्युनियर बॅडमिंटनमध्ये पटकावलेली पदके पाहता, भारतीय बॅडमिंटनचे भविष्य सुरक्षित असल्याचं म्हणता येईल.
अॅथलेटिक्स : नीरज चोप्रा आणि हिमा दासची कामगिरी कौतुकास्पद
भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि धावपटू हिमा दासची यंदाची आंतरराष्ट्रीय कामगिरी ही आगामी ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताची अपेक्षा उंचावणारी ठरली. नीरज चोप्राने 2016 साली भालाफेकीत ज्युनियर गटाचा जागतिक विक्रम नोंदवला होता. यंदा त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि एशियाडची सुवर्णपदके जिंकून, 2020 सालच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताची अपेक्षा उंचावली आहे. हिमा दासने वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर्स शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. ही कामगिरी बजावणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू ठरली.
बॉक्सिंग : सुपरमॉम मेरी कोमने वर्ष गाजवलं
भारताच्या मेरी कोमने कारकीर्दीत सहाव्यांदा जागतिक बॉक्सिंगचे सुवर्णपदक जिंकून, आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. मेरीने वयाच्या 26 व्या वर्षी आणि तीन मुलांची आई झाल्यावर बजावलेली ही कामगिरी भारतीय महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरावी. मेरी कोमने यंदा जागतिक बॉक्सिंगमध्ये 48 किलो गटाचं सुवर्णपदक जिंकलं. पण 2020 सालच्या आगामी ऑलिम्पिकमध्ये 48 किलो गटाचा समावेश नाही. त्यामुळं मेरी कोमला टोकियोत 51 किलो वजनी गटात खेळावे लागेल.
टेबल टेनिस : भारतासाठी सर्वोत्तम वर्ष
भारतीय टेबल टेनिसाठी 2018 हे आजवरचे सर्वोत्तम वर्ष ठरले. भारताने जकार्ता एशियाडमध्ये दोन ऐतिहासिक पदकांची कमाई केली. शरथ कमालच्या नेतृत्त्वाखालील भारतीय पुरुषांनी उपांत्यपूर्व फेरीत जपानला हरवून, सांघिक कांस्यपदकावर नाव कोरलं. शरथ कमाल आणि मनिका बात्रा या जोडीने भारताला मिश्र दुहेरीचेही कांस्यपदक पटकावून दिले. या कामगिरीने भारतीय टेबल टेनिसपटूंना नवा आत्मविश्वास मिळवून दिला आहे.
हॉकी : विश्वचषक जिंकण्याची संधी हुकली
भारतीय हॉकी संघाकडून यंदाच्या विश्वचषकात मोठ्या अपेक्षा होत्या पण उपांत्य फेरीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे 43 वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा अधुरे राहिले. भारतीय हॉकी संघाचा अनुभवी खेळाडू सरदारा सिंगने यावर्षी निवृत्ती स्वीकारली.
घडलं बिघडलं | 2018 मधली क्रीडा विश्वातली भारताची कामगिरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Dec 2018 06:41 PM (IST)
2018 हे वर्ष क्रीडा विश्वात भारतासाठी संमिश्र ठरले. क्रिकेटमध्ये कर्णधार विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली.कुस्तीत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट ने इतिहास रचला. सुपरमॉम मेरी कोम सहाव्यांदा विश्वविजेती ठरली. हॉकीत भारताने विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली. क्रीडा विश्वातल्या घटनांचा आढावा घेऊया.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -