Ganpati Sthapana Vidhi : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावर असेल. गणरायाची यथासांग पूजाअर्चा करुन गणरायाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. गणेशोत्सवाचे 10 दिवस अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडतील. त्यापूर्वी गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त, विधी काय? याविषयी जाणून घेऊया...


गणरायाची स्थापना करण्यासाठी भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्यानं त्या दिवशी जमलं नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. तर एखाद्या वर्षी कोणत्याही कारणानं गणरायाची प्रतिष्ठापना करता आली नाही तर, पुढच्या वर्षी गणरायाची प्रतिष्ठापना करु शकता. यंदाच्या वर्षी पहाटेपासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी गरायाची स्थापना आणि पूजा करता येईल. उत्तम मुहूर्त म्हणून गणपतीची घरी पहाटे 4:50 पासून दुपारी 1:50 पर्यंत कधीही प्रतिष्ठापना करू शकतो. 


'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात बाप्पाची मूर्ती घराघरांत आणली जाते. दारात मुर्तीचे पाय धुवून, अक्षता अर्पण करुन औक्षण केलं जातं. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर मुर्तीची स्थापना केली जाते. गणरायाच्या स्थापनेसाठी सर्वात आधी पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर मूर्ती ठेवली जाते. मुर्तीवर गंगाजल शिपडून देवाला जानवं घातलं जातं. सर्वात आधी गणरायाला पंचामृताने स्नान घालून केशर, चंदन, अक्षता, दुर्वा, फुले, दक्षिणा अर्पण केली जाते. त्यानंतर घरातील सर्व मंडळी गणरायाची पूजा करतात. आरती करुन बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.  


आपल्या श्रद्धेप्रमाणे घराघरांत दीड, पाच, सात आणि दहा दिवस गणरायाची सेवा केली जाते. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा करुन त्याला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटच्या दिवशी जागरण करुन खेळ खेळले जातात. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात बाप्पाला ठरलेल्या वेळी निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा केली जाते.