Marathwada Heavy rain: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असताना राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळतोय. मराठवाड्यात पावसाने कहर केला असून मागील 24 तासांपासून होणाऱ्या मुसळधार पावसानं मराठवाड्यातील 420 महसूल मंडळांपैकी 240 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात पावसानं हैदोस घातला असून अर्ध्या मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाल्यानं दाणादाण उडाली आहे. यात लातूर जिल्ह्यात एक जण पुरात वाहून गेल्याच सांगण्यात आलंय.
अरबी समुद्रात असणाऱ्या सक्रिय कमी दाबाचा पट्ट्यानं मराठवाडा विदर्भात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 47 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून 60 मंडळात तुफान पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नांदेड जिल्ह्यात 42 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून परभणीत तब्बल 50 महसूल मंडळे अतिवृष्टीने बेहाल झाले आहेत.
मराठवाड्यात 284 मंडळात अतिवृष्टीची नोंद
छत्रपती संभाजीनगरमध्ये 47
जालना 29 मंडळात अतिवृष्टी
बीड 60 मंडळात अतिवृष्टी
लातूर 31 मंडळात अतिवृष्टी
धाराशिव 10 मंडळात अतिवृष्टी
नांदेड 42 मंडळात अतिवृष्टी
परभणी 50 मंडळात अतिवृष्टी
हिंगोली 15 मंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसाने 2 मृत्यू, 1 वाहून गेला; 78 जनावरे दगावली
मराठवाड्यात पावसाने कहर केला असून गेल्या 24 तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. लातूरमध्ये पुरात एक जण वाहून गेला असून 78 जनावरे दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. हिंगोली आणि बीड जिल्ह्यात दोन जण दगावली आहेत तर लातूरमधून एक जण वाहून गेलाय. 106 कच्च्या घरांची पडझड झाली आहे.
मराठवाड्यात पावसाचे रौद्ररूप
मराठवाड्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पावसामुळे ओढे आणि नद्यांना पूर आलाय. शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झालंय. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरांची पडझड झाली आहे. बीड नांदेड परभणी लातूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. सखल भागात पाणी हळूहळू शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसानं रौद्ररूप धारण केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय?
हवामान विभागानं जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला असून छत्रपती संभाजीनगरला पावसाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. यावेळी वादळी वाऱ्यांसह व वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार असून वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
छत्रपती संभाजीनगरला 'ऑरेंज अलर्ट', मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात मुसळधारा? IMD नं सांगितलं..