Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सवाचा (Ganesh Chaturthi 2022) सण अवघ्या काही दिवसांवर आहे. गणपतीला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. पण, या नावामागचा नेमका अर्थ काय? हा अनेकदा आपल्याला माहीत नसतो. गणेश सहस्रनाम अर्थात हजार नावे.  याच निमित्ताने आपण रोज गणपतीची वेगवेगळी नावं आणि त्यांचे अर्थ जाणून घेत आहोत.     


श्री. गणेशाची नावं : अर्थ-अन्वयार्थ    


141. सर्वदेवात्मन् : सर्व देवतांच्याही अन्तरंगी विराजित महातत्व.


142. ब्रह्ममूधर्ना : याचे दोन अर्थ आहेत. 1) मूर्धांचा एक अर्थ मस्तक - अर्थात ज्यांचा देह सगुण मानवी आहे. मात्र मस्तक निर्गुण-ब्रम्हरूप गजरूप आहे ते  2) मूर्ध्ना याचा दुसरा अर्थ आहे सर्वात वर 


143. ककुपश्रुती : ककुप् म्हणजे दिशा, श्रुती म्हणजे कान दिशा हेच ज्यांचे कर्ण आहेत ते ककुपश्रुती. 


144. ब्रह्मांडकुम्भ : परिपूर्ण ब्रह्मांडच ज्यांचे कुल आहेत. हत्तीच्या मस्तकावरील उंचवट्यांना कुंभ म्हणतात. 


145. चिद्व्योमभाल : चिन्मय असे आकाश हेच प्रभूंचे भाल अर्थात कपाळ आहे. 


146. सत्यशिरोरूह : सत्यलोक (चतुर्दशभुवनातील सर्वात वरचा स्वर्ग)


147. जगजन्मलयोन्मेशनिमिष : जगताचा जन्म, लय तथा उन्मेष पुन्हा प्रगटणे हेच त्यांचे निमिष अर्थात डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप आहे असे.


148. अग्न्यर्कसोमदृक् : अग्नी, सोम-चंद्र, अर्क-सूर्य हेच ज्यांचे नेत्र आहेत असे.


149. गिरीन्द्रैकरद : गिरी-पर्वत. इंद्र- सर्वश्रेष्ठ. गिरीन्द्र- सर्व श्रेष्ठपर्वत-मेरूपर्वत, तोच ज्यांचा एक-दन्त आहे असे. 


150. धर्माधर्माष्ठ : धर्म आणि अधर्म हेच ज्यांचे ओठ आहेत.  ज्यांच्या वचनांमधूनच धर्म अथर्म स्पष्ट होतात ते. 


151. सामबृंहित : बृंहित म्हणजे गर्जना, सहजहुंकार,    


152. ग्रहर्क्षदशन : ग्रह तथा नक्षत्रे हेच ज्यांचे दात आहेत असे.  


153. वाणीजिव्ह : परा, पश्यन्ती, मध्यमा तथा वैखरी अशा चार प्रकारच्या वाणी ह्याच ज्यांची जीभ आहे असे. 


154. वासवनासिक : वासव म्हणजे इंद्र, तीच जणू त्यांची नासिका असा.


155. कुलाचलांस : अचल म्हणजे पर्वत. त्यांचे कुल म्हणजे समूह.


156. सोमार्कघण्टा : सूर्य आणि चंद्रच ज्यांच्या मुकुटाला किंवा खांद्याला लावलेल्या घण्टा आहेत असे.


157. रूद्रशिरोधर : शिरोधरा म्हणजे मान, जी डोक्याला धारण करतो. रूद्र हीच ज्यांची मान आहे. 


158. नदीनदभुज : नदीच्या पुल्लिंगीरूपात नद म्हणतात. 


159. सर्पागुलिक : शेषनाग इ. सर्प हीच ज्यांची बोटे आहेत असे. 


160. तारकानख : तारका हीच ज्यांची नखे आहेत असे.


161. भूमध्यसंस्थितकर : भुवयांच्या मध्यभागी ज्यांची कर म्हणजे शुंडा. शोभून दिसत आहे असे.


162. ब्रह्मविद्यामदोत्कट : ब्रह्मविद्यारूपी मदखावाने ज्यांचे गंडस्थल ओसंडून वाहात आहे असे. अर्थात ज्यांच्यातून ब्रह्मविद्या वाहते असे. 


163. व्योमनाभी : आकाश हीच नाभी आहे. 


164. श्रीहृदय : वेदांनाच श्री म्हणतात. आध्यात्मविद्येलाच श्री म्हणतात. 


165. मेरूपृष्ठ : मेरू इ. पर्वतच ज्यांचा पाठीचा दांडा आहे. दांडा हा शरीराचा आधार असतो. 


166. अर्णवोदर : समुद्र हेच भगवंताचे उदर आहे. समुद्रातच जीवनाचा आरंभ होतो. 


167. कुक्षिस्थयक्षगन्धर्वरक्ष : किन्नरमानुष:  : यक्ष, गंधर्व, राक्षस, किन्नर, मानव इ.जीव ज्यांच्या कुशीत राहतात ते जेथे सुरक्षित राहतात तथा जेथून उत्पन्न होतात ते कुक्षिक्षेत्र.


168. पृध्विकटी : पृथ्वी हीच जणू कंबर आहे. पृथ्वीवरच जीव निर्माण होत असल्याने ते प्रभूंचे कटिस्थान आहे. 


169. सृष्टिलिंग : ही सृष्टीच जणू लिंग आहे असे. 


170. शैलोरू : शैल अर्थात पर्वत ह्याच उरू म्हणजे मांड्या आहेत ज्यांच्या असे ते. 


171. दसजानुक : अश्विनीकुमार हेच जणू गुडघे आहेत. 


172. पातालजंघा : सप्तपाताळ ह्याच जणू त्यांच्या जंघा आहेत असे. 


173. मुनिपद : चरणसेवारत मुनी सातत्याने चरणांपाशी असल्याने पदांऐवजी तेच दिसतात म्हणून श्रीगणराज जणू मुनिपद ठरतात. 


174. कालांगुष्ठ : महाकालरूपी पादांगुष्ठ असणारे, जणू काळाला पायांच्या अंगठ्याखाली दाबून ठेवतात हा भाव. 


175. त्रयीतनु : ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांना वेदवयी म्हणतात. 


176. ज्योतिर्मंडललांगुल : तारकामंडलरूपी ज्यांची लांगूल म्हणजे शेपूट आहे असे. शेपटी हा शब्द विस्तार या अर्थी आहे. 


177. हृदयालाननिश्चल : भक्तांच्या हृदयरूपी खांबांना निश्चलपणे बांधले गेलेले, स्थिर झालेले. 


178. हृत्पद्मकर्णिकाशालीवियत्केलिसरोवर : हृत्पद्म-हृदयरूपी कमळ. कर्णिका -कमळाचा गाभा, शाली सुशोभित, सुंदर, वियत्-आकाश केलीसरोवर-क्रीडासरोवर अर्थात 'हृदयकमलातील सुंदर गाभारारूप आकाशात जणू काही  क्रीडा करतात असे ते.'


179. सद्भक्तध्यान निगड : सद्भक्त ज्यांना आपल्या ध्यानात बंदिस्त करून ठेवतात ते. 


180. पूजावारीनिवारित : पूजारूपी साखळीने बांधले जाणारे. 


181. प्रतापी : पराक्रमसंपन्न 


182. कश्यपसुतो : भगवान श्रीगणेशांनी देवान्तक तथा नरान्तक नामक राक्षसांच्या वधासाठी कृतयुगात महर्षी कश्यपांच्या घरी देवी अदितीच्या पुत्ररूपात महोत्कट वा विनायक नामक अवतार धारण केला होता.


183. गणप : गण शब्दांचे आपण पाहिलेले विवेचन. त्यांचे पालक.


184. विष्टप : विष्टपचा आधार असा अर्थ आहे. या अनंतकोटी ब्रम्हांडाचा आधार. 


185. बली : बलसंपन्न, शारीरिक शक्तीसंपन्न


186. यशस्विन् : इच्छामावेच सकल कामना सफल होणाऱ्या भगवंतांचा अपयशाशी संबंधच नसतो. ते नित्ययशस्वीय असतात. 


187. धार्मिक : 1) धर्माचे पालन करतो तो धार्मिक 2) धर्मानेच ज्याला आत्मसात करता येते तो


188. स्वोजसे : ओज शब्दाचा अर्थ असतो फाकलेले तेज. 


189. प्रथम : सर्वाद्यतत्व 


190. प्रथमेश्वर : ब्रह्मा विष्णू महेशादिकांना ईश्वर म्हणतात. 


191. चिन्तामणिद्वीपपति : मनात आणावे ते सर्व काही क्षणात प्रदान करणारा मणि आहे चिंतामणि. 


192. कल्पद्रमवनालय : एक कल्पवृक्ष समस्त वैभवांचा प्रदाता असतो. येथे कल्पवृक्षांचे वन आहे. 


193.रत्नमण्डममध्यस्थ : त्या कल्पवृक्षवनात रत्नमंडपात ते वसले आहेत असे. 


194. रत्नसिंहासनाश्रय : सिंह हेच राजवैभवाचे प्रतीक, त्या सिंहावरबसणे हेच अतिवैभवाचे प्रतीक. 


195. चीव्राशिरोधृतपद : तीव्रा नामक देवतेने ज्यांची चरणकमले मस्तकावर धारण केली आहेत असे. 


196.ज्वालिनीमौलिलालित : ज्वालिनी नामक शक्ती आपल्या मुकुटाने ज्यांच्या चरणांना कुरवाळले असे. 


197. नंदानन्दितपीठश्री : नंदा नामक शक्ती ज्यांच्या पीठाला आसनाला प्रसन्नपणे सुशोभित करीत आहे असे. 


198. भोगदाभूषितासन : बोगदा नामक देवी ज्यांचे सिंहासन विभूषित करते असे. 


199. सकामदयिनीपीठ : कामदायिनी शक्तीने ज्यांचे आसन युक्त आहे असे. 


200. स्फुरदुग्रासनाश्रय : उग्रा नामक शक्तीने चमकणाऱ्या सिंहासनावर विराजित असे. 


(माहिती संकलन स्रोत : विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांच्या गणेश सहस्रनाम पुस्तकातून)


महत्वाच्या बातम्या :