Food: काजू..बदाम..पिस्ता...अक्रोड...सुका मेवा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर ही फळं येतात. पण जेव्हा जेव्हा ड्रायफ्रुट्सचा उल्लेख केला जातो तेव्हा 'अंजीर' हे यादीत अग्रस्थानी असते. पण तुम्हाला माहिती आहे का? की जैन समाजाचे लोक अंजीर खात नाहीत. मात्र, याचे कारण जाणून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटेल. कारण सध्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्यात अंजीर हे मांसाहारी की शाकाहारी? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.
'अंजीर' हे शाकाहारी नाही?
अंजीरांचे परागीभवन गांधील माशी यांच्या व्दारे होते. गांधील माशी अंजीराच्या फळामध्ये अंडी घालण्यासाठी एका खास पद्धतीने प्रवेश करतात. अंड्यातून बाहेर येईपर्यंत अळ्या आतमध्ये विकसित होतात. नर गांधील माशी फळांच्या आतील मादी गांधील माशी बरोबर संग करतात आणि नंतर मादींना बाहेर काढण्यास मदत करतात, अंजीरमध्ये अडकल्यामुळे तिला त्यातून बाहेर पडता येत नाही आणि त्यातच तिचा मृत्यू होतो. यानंतर, अंजीरचे फळ ते शोषून घेते आणि त्यातील एन्झाईम्स ते नष्ट करतात. आणि फळामध्ये मिसळतात. अशा परिस्थितीत हे फळ तयार करताना एका जीवाचा मृत्यू झाला असे मानण्यात येते. अशाप्रकारे मृत गांधील माशी फळाचा एक भाग बनतात, जे सामान्यतः खाल्ले जाते.पण आता प्रश्न पडतो की जैन अंजीर का खात नाहीत?
सेलिब्रिटीने केला व्हिडीओ शेअर, 3.16 कोटी व्ह्यूज
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शेनाज ट्रेझरीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने जैन आपल्या आहारात अंजिराचा समावेश का करत नाही हे सांगितले होते. शेनाजने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले 'हो! 'यामुळे जैन अंजीर खात नाहीत - हे कारण आहे!' हा व्हिडीओ आम्ही इथे शेअर करत आहोत. पोस्टमध्ये एक व्यक्ती अंजीराची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करताना दिसत आहे. या पोस्टला सध्या 688,486 लाईक्स आणि 3.16 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टवर हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत.
जैन समाजाचे लोक अंजीर का खात नाहीत?
जैन धर्मात अहिंसेला खूप महत्त्व दिले गेले आहे. सर्व प्राणिमात्रांचा आदर राखणे महत्त्वाचे आहे, असे या समाजाचे मत आहे. हा धर्म तत्वज्ञान, अहिंसा, इतर मानवांना आणि प्राण्यांना इजा पोहोचवत नाही. याचा अर्थ वनस्पती आणि सूक्ष्मजीवांसह जीवनाच्या अगदी लहान स्वरूपांना देखील हानी पोहोचवू नका. असं त्यांच्या धर्मात सांगितलंय. अशावेळी जैन धर्माचे लोकही या तत्त्वाचा वापर त्यांच्या खाण्याच्या प्रक्रियेत करतात. अंजीर मध्ये गांधील माशीचे काही घटक असू शकतात हे त्यांना माहीत आहे. याव्यतिरिक्त, अंजीरमध्ये सजीव प्राणी असतात. हे जीव खूप लहान आहेत, त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत, परंतु ते जिवंत आहेत. असा त्यांचा समज असतो, ज्यामुळे या कारणास्तव जैन लोक अंजीराचे सेवन करत नाहीत.
अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर
सुका मेवा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण अंजीर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? होय, अंजीर हे एक फळ आहे जे कच्चे आणि कोरडे दोन्ही प्रकारे खाऊ शकतात. अंजीर याला इंग्रजीत Fig म्हणतात. अंजीराच्या अनेक प्रजाती जगभरात आढळतात. अंजीरमध्ये पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
अंजीर खाण्याचे 'हे' फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
लठ्ठपणा - लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करू शकता. कारण अंजीर हे कमी कॅलरी असलेले अन्न आहे, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते.
दमा - दम्याच्या रुग्णांसाठी अंजीराचे सेवन फायदेशीर आहे. अंजीर खाल्ल्याने शरीरातील श्लेष्मल त्वचेला आर्द्रता मिळते आणि कफ साफ होतो. अस्थमाचे रुग्ण दुधासोबत खाऊ शकतात.
प्रतिकारशक्ती - अंजीर हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप चांगले फळ मानले जाते. कारण त्यात जीवनसत्त्वे, पोटॅशियम, खनिजे, कॅल्शियमचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता - जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही अंजीरचे सेवन करू शकता. अंजीरमध्ये आढळणारे गुणधर्म पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम देतात.
हाडे मजबूत होतात - अंजीरमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. अंजीर आणि दुधाचे सेवन करून कमकुवत हाडांची समस्या टाळता येते.
लोहाची कमतरता - जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर अंजीरचा आहारात समावेश करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. अंजीर आणि दुधाच्या सेवनाने लोहाच्या कमतरतेवर मात करता येते.
मधुमेह - अंजीरमध्ये फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्वे आढळतात, जे मधुमेहासाठी उपयुक्त ठरू शकतात. एवढेच नाही तर अंजीराच्या सेवनाने इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
हेही वाचा>>>
Viral: 'सण प्रत्येकासाठी सारखेच नसतात!' दिवाळीत डिलिव्हरी बॉयने तब्बल 6 तास काम केलं, पण कमाई पाहाल तर डोळे भरून येतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )