Fashion : गुलाबाची कळी बघा हळदीने माखली...आली लाली गोऱ्या गाली... सध्या असंच काहीसं तेज नववधू राधिका मर्चंटच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ज्या शाही लग्नाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय, ते लग्न आज शुक्रवार, 12 जुलै रोजी अंबानी कुटुंबातील सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याची बालपणीची प्रेयसी राधिका मर्चंटसोबत विवाहबद्ध होणार आहे. या भव्य लग्नासाठी परदेशातील अनेक सेलिब्रिटीही भारतात आले आहेत. लग्नाच्या पूर्वसंध्येला हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी नववधू राधिका मर्चंटने तिच्या हळदी समारंभात अतिशय सुंदर लूक कॅरी केला होता. तिने पारंपरिक पिवळा पोशाख परिधान करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. तिचा हा लूक सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.


 


 


नववधूचा खास लूक! राधिकाच्या दुपट्ट्याची चर्चा


मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानी धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे विधी खूप पूर्वीपासून सुरू आहेत. जुलैच्या सुरुवातीला मामेरू विधी पार पडला. यानंतर संगीत, हळदी, मेहंदीचे आयोजनही मोठ्या थाटात करण्यात आले. हळदीच्या दिवशी फुलांच्या दुपट्ट्याने नववधूचा लूक खास बनवला होता. या दुपट्ट्याची खास गोष्ट म्हणजे तो खऱ्या फुलांपासून बनवला होता. राधिकाचा फोटो समोर आल्यानंतर तरुणींना तिचा लूक खूप आवडला आहे. तुम्हालाही लग्नात या प्रकारचा फुलांचा दुपट्टा घालायचा असेल तर या दुपट्ट्याबद्दल आधी जाणून घ्या. 




 


राधिकाचा लूक कसा होता?


फुलांच्या दुपट्ट्याबद्दल जाणून घेण्याआधी राधिकाचा संपूर्ण लुक जाणून घ्या. राधिकाने तिच्या हळदी समारंभासाठी पारंपरिक पिवळा पोशाख निवडला होता. हळदी समारंभासाठी, प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने राधिकाला सजवले होते. तर राधिकाने परिधान केलेला पिवळा लेहेंगा डिझाइन करण्याचे श्रेय डिझायनर अनामिका खन्ना यांना जाते.




 90 हून अधिक झेंडूची फुले, मोगऱ्यांच्या कळ्या..


राधिकाने तिचा हळदी लूक पूर्ण करण्यासाठी लेहेंग्यासोबत कॅरी केलेला दुपट्टा खूपच खास होता. हा दुपट्टा तयार करण्यासाठी 90 हून अधिक झेंडूची फुले आणि असंख्य मोगरे कळ्या वापरण्यात आल्या आहेत. दुपट्ट्याची बॉर्डर पिवळ्या झेंडूच्या फुलांनी, तर संपूर्ण दुपट्टा मोगऱ्याच्या फुलांनी बनवला होती. या दुपट्ट्यामुळे राधिकाचा हळदीचा लूक इतरांपेक्षा खूपच वेगळा दिसत होता.




'या' किमतीत तयार होईल


राधिकाच्या हळदीच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून मुलीही तिच्या लूकच्या प्रेमात पडल्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या लग्नासाठी असा दुपट्टा तयार करायचा असेल तर तुम्हाला तो आधीच ऑर्डर करावा लागेल. मात्र, त्याची तयारी करण्यासाठी फक्त एक रात्र लागते. खूप आधीपासून तयार केल्यास त्याची फुले खराब होऊ शकतात. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, हा फुलांचा दुपट्टा बनवण्यासाठी 15,000 ते 20,000 रुपये सहज खर्च येऊ शकतात. तुम्हाला किती मोठा दुपट्टा हवा आहे आणि कोणती फुले हवी आहेत यावर त्याची बाकीची किंमत अवलंबून आहे.




फुलांचे दागिने देखील सुंदर आहेत


राधिकाचा हळदी लूक पूर्ण करण्यासाठी राधिकाने केवळ फुलांचा दुपट्टाच नाही तर फुलांचे दागिनेही घातले होते. तिच्या हल्दी लूकमध्ये राधिकाने फुलांचा मणी असलेला चोकर आणि लांब हार घातला होता. यासोबतच मॅचिंग फुलांचे झुमके आणि लांब बांगड्या तिच्या सौंदर्यात भर घालत होती. जर तुम्हाला राधिकाप्रमाणे फुलांचे दागिने आणि दुपट्टा घेऊन जायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सुमारे 25 ते 30 हजार रुपये मोजावे लागतील.


 


हेही वाचा>>>


Fashion : वयाच्या 60 मध्ये शोभते सौंदर्यवती..! नीता अंबानींसारखं सुंदर आणि रॉयल दिसायचंय? 'हे' सूट एकदा ट्राय करा..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )