मुंबई : सध्या महागाईची सर्वसामान्यांना चांगलीच झळ बसत आहे. तेल, डाळीसोबतच टोमॅटोचे भाव तर अगदी गगनाला भिडले आहेत. अशात प्रत्येकजण काटकसर करून काही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो. काही लोक एसी-कूलर यासारख्या उपकरणांचा वापर कमी करतात. लाईट, बल्ब, पंखे कमी प्रमाणात वापरतात. तर, काही जण रात्रीच्या वेळी फ्रीज (Fridge) बंद करतात. वीज बचत ही चांगली सवय आहे, पण रात्रीच्या वेळी फ्रीज बंद ठेवणं योग्य की अयोग्य यामुळे खरंच वीजेची बचत होते का याबाबत सविस्तर जाणून घ्या.


रात्रीच्या वेळी फ्रीज बंद करणं योग्य की अयोग्य?


सध्या बहुतेक घरांमध्ये फ्रिज म्हणजेच रेफ्रिजेटर असतोच. अनेक खाद्यपदार्थ असे असतात की, जे व्यवस्थित साठवले गेले नाही तर खराब होतात. दूध, भाज्या, फळे असे खाद्यपदार्थ साठवण्यासाठी फ्रिज आवश्यक आहे. फ्रीजमधील थंड तापमानामुळे त्यात ठेवलेल्या वस्तू खराब होत नाहीत आणि दुर्गंधीही येत नाही. फ्रिज हे विजेवर चालणारे हे उपकरण आहे. दिवसभर सुरू असलेले रेफ्रिजरेटर वीज वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी ते बंद केले, तर काय होईल आणि किती वीज वाचेल? यामुळे वीज बिलावर परिणाम होऊन वीज बिल कमी होऊ शकते का, याचे फायदे आणि तोटे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फ्रीज बंद ठेवावा की नाही?


फ्रीज बंद करावा की नाही?


घरातील फ्रीज 24 तास चालू ठेवावा. ते कधीही बंद केल्यास त्यातील खाद्यपदार्थ खराब होण्याची शक्यता असते. याशिवाय फ्रीज बंद ठेवल्याने खाद्यपदार्थांवर बुरशीची लागण होण्याची शक्यता असते. ही बुरशी रेफ्रिजरेटरच्या बर्‍याच भागांमध्ये पसरते. यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ खराब होतील. यासोबत फ्रिजच्या आतील अनेक भागांवर म्हणजेच फ्रिजचा दरवाजा, शेल्फच्या कडा आणि इतर आतील भाग यांवरही परिणाम होऊ शकतो.


फ्रिज रात्रभर बंद ठेवल्यास काय होईल?


फ्रीज बंद केल्यावर नंतर तो फक्त दोन ते तीन तास थंडपणा कायम ठेवू शकतो. जर, तुम्ही रात्रभर किंवा पाच ते सहा तास फ्रिज बंद ठेवण्याचा विचार करत असाल तर यामध्ये तुमचंच नुकसान होईल. रात्री रेफ्रिजरेटर बंद ठेवल्यास कमी थंडीमुळे आतील पदार्थ खराब होऊ शकतात. फ्रीजच्या आतील तापमान वाढल्यामुळे बुरशी येऊ शकते आणि बुरशीयुक्त अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्यही बिघडू शकते. 


फ्रिज बंद ठेवल्याने विजेची बचत होते का?


फ्रीज बंद ठेवल्याने विजेची थोडी बचत होऊ शकते. पण, ते तितकं फायदेशीर नाही. रेफ्रिजरेटर बंद केल्यावर त्यातील तापमान वाढू लागते. तुम्ही काही वेळाने फ्रीज पुन्हा चालू केल्यास, कंप्रेसरला फ्रीज पुन्हा त्याच तापमानात थंड होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. यामुळे फ्रिजच्या आतील भागांवरही परिणाम होऊ शकतो, यामुळे फ्रिजही खराब होण्याची शक्यता असते.