Diwali 2023 : राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali 2023) सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरु झाला आहे. दिवाळीच्या निमित्ताने पाहुण्यांना भेटीगाठी देणं, घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवणं देखील सुरु झालं आहे. दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांचं तोंड गोड करण्यासाठी आपण त्यांना मिठाई किंवा फराळ देतो. पण, तुम्ही देत असलेली मिठाई (Sweets) भेसळयुक्त असली तर? खरंतर, या गोष्टीचा आपल्याला अंदाज येत नाही. मात्र, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे दिवाळीत जेव्हा मिठाईची मागणी वाढते तेव्हा बनावट मिठाई बनवण्याचं प्रमाणही वाढतं. नफा मिळविण्यासाठी, फसवणूक करणारे बनावट आणि रासायनिक रंगाच्या मिठाई बाजारात अगदी सर्ऱास विकल्या जातात. ज्यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी बनावट मिठाई शरीराला कशा प्रकारे नुकसान पोहोचू शकते हे जाणून घेणं गरजेचं आहे. 
 
बनावट मिठाई कशी बनवली जाते?


बनावट मिठाई बनवण्यासाठी फसवणूक करणारे खवा आणि दुधाऐवजी फर्टिलायजर, बटाटा, आयोडीन, डिटर्जंट, सिंथेटिक दूध, व्हाईटनर, चॉक, युरिया आणि इतर प्रकारची रसायने वापरली जातात. इतकंच नाही तर, मिठाईला सजवण्यासाठी सिल्व्हर वर्क ऐवजी अॅल्युमिनियम वर्कचा वापर केला जातो. जो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. 
 
बनावट मिठाईमुळे आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान होते 


मिठाईमध्ये रंगाच्या नावाखाली रसायने मिसळणे, बनावट मावा, नकली दूध यांचा वापर केला जातो. यामुळे शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. अशा मिठाईच्या सेवनाने कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, किडनीचे आजार, श्वसनाचे आजार आणि अनेक प्रकारच्या अॅलर्जी होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी मिठाईत भेसळ करताना त्यात स्टार्च आणि अनसॅच्युरेटेड फॅट सारख्या गोष्टी मिसळल्या जातात, ज्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी खूप वाढते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. मिठाईवरील अॅल्युमिनिअमचे कण पोटात जाऊन मेंदू आणि हाडांना मोठं नुकसान पोहोचवते. याच्या सेवनाने मुलांच्या किडनीवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. यासाठी बाजारातून मिठाई विकत घेताना सतर्क राहणं गरजेचं आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Diwali 2023 : दिवाळीत भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा 'हे' चविष्ट पदार्थ; टेस्टीही आणि हेल्दीही