Diwali 2022 : कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम संवत्सर मानणाऱ्या उत्तर भारतीयांचा आणि विशेष करून व्यापारी वर्गाचा नवीन वर्षाचा दिवस. या दिवसाला 'दीवाळी पाडवा' (Diwali Padwa) असे देखील म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवीन कपडे घालून आनंदाची उधळण करण्याचा हा दिवस आहे. यावर्षी हा दिवस 26 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे.


या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यालाच चोपडी पूजन असं म्हटलं जातं.


विक्रम संवत म्हणजे काय? 


विक्रम संवत कॅलेंडर प्रणालीचा उगम ''विक्रम'' या युगात झाला आहे, ज्याचा शोध सन 842 मधील शिलालेखात सापडतो. 971 चा एक शिलालेख देखील आहे जो राजा विक्रमादित्यशी संबंधित आहे. अनेक इतिहासकार यावर विवाद करतात आणि मानतात की हा राजा चंद्रगुप्त दुसरा होता ज्याने स्वतःला विक्रमादित्य ही पदवी दिली आणि त्या कालखंडाचे नाव बदलून ''विक्रम संवत'' केले.


विक्रम संवत नवीन वर्ष 2022


2022 मध्ये, विक्रम संवत कॅलेंडरमधील पहिला दिवस 26 ऑक्टोबर, बुधवारी येतो. हा दिवस गुजरात राज्यातील प्रादेशिक सार्वजनिक सुट्टी देखील आहे, जिथे तो सहसा दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.


संवत 2079 म्हणजे काय?


संवत 2079, दिवाळीपासून सुरू होणारे प्राचीन हिंदू कॅलेंडर वर्ष, जागतिक मॅक्रो आणि पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांमधील अनिश्चितता लक्षात घेऊन अस्थिर राहण्याची शक्यता आहे.


काय आहे आख्यायिका?


या कालाचा प्रारंभ कलियुगाची 3,044 वर्षे क्रमल्यानंतर झाला, अशी कल्पना आहे. याच्या नव्या वर्षाचा आरंभ सध्या उत्तरेत चैत्र शुक्ल 1 शुक्र 1 (चैत्रादी) व दक्षिणेत कार्तिक शुद्ध 1 (कार्तिकादी) या मितीस होत असला, तरी उत्तरेतील इ. स. बाराव्या शतकापर्यंतच्या लेखांत याचे कार्तिकादी निर्देश अधिकतर येतात, तर सोळाव्या शतकापर्यंतच्या लेखांत चैत्रादी निर्देश बहुसंख्य आहेत. चैत्रादी  पद्धतीमुळे उत्तरी विक्रम संवत्‌ दक्षिणेतील विक्रमसंवतापेक्षा सात महिने अगोदर सुरू होतो.  शकात 135 मिळविले असता चैत्रादी विक्रम आणि 134 अगर 135 मिळविले असता कार्तिकादी विक्रम येतो. या कालाचे दक्षिणेतील महिने अमान्त आणि उत्तरेतील पूर्णिमान्त आहेत. काठेवाड, गुजरात आणि राजस्थानचा काही भाग यांत या कालाचा आरंभ आषाढ शुद्ध 1 पासून आणि उदेपूर इ. राजस्थानातील संस्थानांत तसेच राजकीय व्यवहारात हा संवत्‌ पूर्णिमान्त श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून धरतात. पैकी आषाढादी विक्रमाचे उल्लेख शिलालेख आणि जुने ग्रंथ यांतही आढळतात.


अकराव्या आणि बाराव्या शतकातील विक्रम संवत्‌ निर्दिष्ट असलेल्या शेकडा 15 लेखांत या संवताशी विक्रम शब्दाची जोड दिली आहे. कणस्वा येथील संवत्‌ 795 च्या लेखांत मालवेशानाम्‌ शब्दाने विक्रमसंवताचा निर्देश आहे. मंदसोर येथील संवत्‌ 589, 493, आणि 461 च्या तीन लेखांत या संवताचा उल्लेख मालवगणस्थिति, मालवानां गणस्थित्या व मालवगणाम्नाते या शद्बांनी आणि नगरी येथील 481 च्या लेखात हाच अभिप्राय मालवपूर्वाया शद्बाने व्यक्त केला आहे.  उपर्युक्त नगरी लेखात तसेच गंगधार (480), विजयगढ (428), बर्नाला (335, 284), बडवा (295) आणि नांदसा (282) या गावी मिळालेल्या व कंसातील कालोल्लेख असलेल्या लेखांत या संवताचा निर्देश कृत या शब्दाने केला आहे. या सर्व निर्देशांवरून ध्यानात येईल की, या गणनेचे प्राचीनतम निर्देश कृत शब्दाने केले आहेत. जयपूर संस्थानातील नगर गावी मिळालेल्या काही नाण्यांवर मालवानां जयः असा लेख असून त्याचा काल इ. स. पू. 250 ते इ. स. 250 पर्यंत केव्हाही असू शकेल. इ. स. 60 च्या सुमारास शकांनी उज्जयिनी हस्तगत केली असता, त्यांना ती लवकर सोडावी लागली असे इतिहास सांगतो.


या सर्वांचा निष्कर्ष असा काढण्यात येतो की, इ. स. पू. 57 या वर्षी मालव गणातील कृत नावाच्या महायोद्धयाने स्वपराक्रमाने शकांचा पराभव करून त्यांना उज्जयिनीतून हाकलून लावले. या प्रसंगाच्या स्मरणार्थ हा काल सुरू करण्यात आला. यामुळे त्यास प्रथम कृत, नंतर मालव आणि अगदी अखेरीस विक्रम हे नाव मिळाले. त्याचे विक्रम हे नाव उज्जयिनी येथील द्वितीय चंद्रगुप्त-विक्रमादित्याच्या राजवटीच्या स्मरणामुळे दिले गेले असण्याची शक्यता आहे.


कलियुगाची 3,179 वर्षे झाल्यानंतर हा सुरू झाला असे सध्या समजतात. मलबार आणि तिनेवेल्ली सोडल्यास साऱ्या दक्षिणेत आणि अंशतः उत्तरेतही याचा प्रचार आहे.  महाराष्ट्रात याची गतवर्षसंख्या आणि तमिळ प्रदेशात याचे चालू वर्ष सांगण्याचा प्रघात असल्यामुळे तमिळ प्रदेशातील याची वर्षसंख्या महाराष्ट्रातील वर्षसंख्येपेक्षा एक वर्षाने पुढे असते. उदा., महाराष्ट्रातील शक 1869 ला तमिळ प्रदेशात 1870 म्हणतात. यामध्ये 78 किंवा 79 मिळविले म्हणजे इसवी सन येतो आणि 134 किंवा 135 मिळविले म्हणजे विक्रम संवत येतो.