Bus Fare Hike: सण, उत्सवाच्या काळात एसटी आणि रेल्वेत आरक्षण न मिळाल्याने अनेकांना खाजगी बसचा आधार घ्यावा लागतो. मात्र, खाजगी बस चालकांकडून होत तिकिट दरवाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले जाते. या खाजगी तिकिट दरवाढीच्या नियंत्रणासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याचे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, खाजगी ट्रॅव्हलसकडून होत असलेल्या दरवाढीला एसटीच्या तिकिट दराचा आधार आहे. मात्र, तिकिट दराच्या नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने सामान्य प्रवासी भरडला जात असल्याचे चित्र आहे.
दीड पट अधिक भाडे आकारणीसाठी मंजुरी
एसटी महामंडळाकडून काही सणांच्या निमित्ताने विशेषत: दिवाळी दरम्यान बस भाडे वाढ करण्यात येते. त्यानंतर खाजगी बस चालकांकडून दरवाढ होते. खाजगी बस चालकांकडून होणाऱ्या तिकिट दरांच्या मुद्यावरून आणि प्रवाशांच्या हक्कांसाठी अॅड. असीम सरोदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निकाल देताना कोर्टाने एसटीच्या तिकिट दराच्या दीडपट अधिक आकारणीसाठी मंजुरी दिली होती. मात्र, खाजगी बस चालकांकडून अधिक दर आकारणी होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
अॅप कंपन्यांचा फायदा?
डिजीटल युगात आता अनेक खाजगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटांची बुकिंग अॅप द्वारे होते. यामध्ये एका ट्रॅव्हल्स चालकांचे तिकिट दर निश्चित असतात. मात्र, अतिरिक्त दर हे अॅप कंपन्यांकडे जात असल्याची माहिती एका ट्रॅव्हल्स चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तर, दुसरीकडे अतिरिक्त दर आकारणाऱ्या अॅपवर कारवाई करणे आमच्या अखत्यारीत नसल्याचे परिवहन विभागाचे अधिकारी सांगतात.
प्रशासकीय यंत्रणांची अनास्था
खाजगी बसेस आपल्या दरात दाम दुप्पट वाढ करून सर्रास प्रवाशांची आर्थिक लुट करत असल्याने ह्या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत असते. प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी ही जबाबदारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व राज्यसरकारची आहे पण सगळ्यांनी प्रवाशांना वाऱ्यावर सोडून दिले आहे असे चित्र असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. परिवहन विभागाचे अधिकारी प्रायव्हेट ट्रॅव्हल्स कंपन्यांशी त्यांचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यात व्यस्त आहे आणि सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही अशी परिस्थिती गलथान कारभाराचा नमुना असल्याची टीका त्यांनी केली.
एसटीचा प्रवास आजपासून 10 दिवसांसाठी महाग
दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी प्रवास भाड्यात होणारी वाढ आजपासून लागू झाली आहे. आजपासून एसटी प्रवासामध्ये 5 रुपये तर 75 रुपयांची वाढ झाली असून ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे. एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या काळात महसूल वाढीसाठी दरवर्षी अशी वाढ लागू करण्यात येते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे.