Dhanteras 2020 : देशभरात यंदाची दिवाळी कोरोना संकटात साधेपणाने साजरी केली जात आहे. असं असलं तरी दिवाळी साजरी करतानाचा उत्साह मात्र तोच आहे. दिवाळी साधेपणानं साजरी करत फटाके न फोडण्याचं आवाहन प्रशाननाकडून करण्यात आलं आहे. दिवाळीला सुरुवात झाली असून काल बसुबारस साजरी केल्यानंतर आज मोठ्या उत्साहात धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. पण तुम्हाला धनोत्रयोदशीचं महत्त्वा माहीत आहे का? आज आपण धनत्रयोदशी का साजरी करतात आणि त्याचं महत्त्व याबद्दल थोडंस जाणून घेऊया.


दिवाळीत दिव्यांची आरास लावून, आकर्षक रोषणाई करत, फराळ या गोष्टींसह उत्साह आनंद साजरा केला जातो. दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेल्या संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे, धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं.


कार्तिक महिन्यातील कृष्णपक्ष (पूर्णिमंत)च्या त्रयोदशीच्या दिवशी अमृत कलश घेऊन भगवान धन्वंतरी समुद्र मंथनाच्या निमित्ताने प्रकट झाले, म्हणून ही तारीख धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखली जाते. भगवान धन्वंतरी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या निमित्ताने भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे, ही भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला प्रत्येकजण भांडी खरेदी करतात.


धनत्रयोदशीला पूजेचा शुभ मुहूर्त :


लक्ष्मीपूजनाच्या आधी येते धनत्रयोदशी. या दिवशी धनाची पूजा केली जाते. सोन्यानाण्यांवर गंधाक्षता फूल वाहिले जाते. यावर्षी धनत्रयोदशी 13 नोव्हेंबर म्हणजेच, शुक्रवारी आली आहे. शुक्रवार हा देवीचा वार. लक्ष्मीचा वार मानला जातो. चांगल्या मार्गाने, चांगल्या हेतूने कमावलेली संपत्ती आपल्या घरात टिकून राहावी, वृद्धिंगत व्हावी, यादृष्टीने धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते. अनेक जण सुट्टीअभावी किंवा कौटुंबिक प्रथेप्रमाणे लक्ष्मीपूनाच्या दिवशी संपत्ती पूजन करतात. दिवस बदलला, तरी धनलक्ष्मीची पूजा करणे हाच मुख्या उद्देश असतो.


सोनं खरेदी कराण्याचा आणि पूजेचा शुभमूहूर्त धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करायचं असल्यास सकाळी 6 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांपर्यंत ते खरेदी करावं. हा काळ हिंदू पंचांगानुसार सोनेखरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. कोरोना महामारीमुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा शक्य असल्यास ऑनलाईन खरेदी करा. हिंदू पंचांगानुसार, 13 नोव्हेंबर 2020 शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांपासून 5 वाजून 59 मिनिटांपर्यत धनत्रयोदशीची पूजा करण्याचा उत्तम मुहूर्त आहे.


पाहा व्हिडीओ : 'धनत्रयोदशी'चे महत्व; धनत्रयोदशी-आयर्वेदाचा संबंध काय?



धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा ही धन्वंतरीच्या स्मृतीप्रत्यर्थ सुरु झाली असंही सांगितलं जातं. या दिवशी नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ ठेवला जातो. यासोबत गूळ, खोबरं, पुरणपोळी किंवा इतर पदार्थांचा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे. दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. तर आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरीची पुजा केली जाते. औषधी वनस्पती लावल्या जातात. या दिवशी झेंडु आणि शेवताच्या फुलांचा बहर किंवा हंगाम असल्यानं या दिवशी या फुलांचे हार सजावटीसाठी वापरतात किंवा देवाला वाहिले जातात. रात्री पणत्या आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई करून घर आणि गावं उजळवली जातात. अनेक गावांमध्ये आजही पहाटे आणि रात्री पणत्या लावण्याची प्रथा आहे. तिथे दिव्यांपेक्षा पारंपरिक पद्धतीच्या पणत्यांना अधिक महत्त्व दिलं जातं.


यंदाच्या दिवाळीचे महत्त्वाचे दिवस :

  • वसुबारस : निज अश्विन कृष्ण द्वादशी - 12 नोव्हेंबर 2020, गुरुवार.

  • धनत्रयोदशी : निज अश्विन कृष्ण त्रयोदशी - 13 नोव्हेंबर 2020, शुक्रवार.

  • नरक चतुर्दशी : निज अश्विन कृष्ण चतुर्दशी - 14 नोव्हेंबर 2020, शनिवार.

  • लक्ष्मीपूजन : निज अश्विन अमावास्या - 14 नोव्हेंबर 2020, शनिवार.

  • बलिप्रतिपदा/पाडवा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा - 16 नोव्हेंबर 2020, सोमवार.

  • भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीया - 16 नोव्हेंबर 2020, सोमवार.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Dhanteras 2020: धनत्रयोदशीला खरेदी केलेली भांडी कधीच रिकामी ठेवू नका, या वस्तू भरा