Dipawali 2022 : भारतात प्रामुख्याने साजरा केला जाणारा दिवाळी (Diwali 2022) हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटलं की अगदी लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. दिवाळी सणाची बदलती व्याख्या देखील आपण सर्वांनी कोरोना काळात अनुभवली आहे. दिवाळीबरोबर अशाच काही नवीन-जुन्या आठवणी आपल्या कायम स्मरणात आहेत. मात्र, दिवाळी नावामागचा अर्थ नेमका काय? दिवाळीला अनेक जण वेगवेगळ्या नावांनी संबोधतात ही नावे कोणती हे या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत.
दिपावलीची विविध नावे (Names Of Dipawali) :
दिवाळी (Diwali) या सणाला दीपावली (Dipawali) असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. दिवाळी या सणाला काही जण दिपवाळी (Dipwali) असे देखील म्हणतात. मात्र, दिवाळीचा शुद्ध शब्द हा "दीपावली" आहे. मुळात, दिवाळी या शब्दाचा प्रत्येक प्रांतात, भाषेत वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे.
अशी आहे आख्यायिका :
दीपावलीचे मूळचे नाव "यक्षरात्री" असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे अशी आख्यायिका आहे. नीलमत पुराणया ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे. भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे. तसेच, काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.
असा हा दिपावली नावामागचा अर्थ आहे. मात्र, या नावाचे अर्थ जरी वेगळे असले तरी मात्र, प्रत्येकजण आपुलकीनुसार त्या नावाचा उच्चार करत असतो. या सगळ्यात मात्र, दिवाळीचा आनंद, उत्साह आणि जल्लोष प्रत्येक भारतीयांच्या मनात कायम असतो.
महत्वाच्या बातम्या :