Champa Shashthi 2022 : आज, मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठी (Champa Shashthi 2022) आहे. दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथीला साजरा केला जातो. आज पूजेत वांगी अर्पण केली जातात, म्हणून याला 'वांगे छठ' असेही म्हणतात. चंपाषष्ठी व्रत दोन शब्दांनी बनलेले आहे. एक चंपा आणि दुसरी षष्टी. या दिवशी भगवान शंकराचे स्वरूप खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटकात हे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक लोकांचे कुलदैवत खंडोबा (Khandoba) मानले जाते, त्यामुळे हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. जाणून घ्या याचे महत्व



जेजुरी 'येळकोट येळकोट जय मल्हार' जागराने दुमदुमली 
24 नोव्हेंबरपासून खंडेरायाच्या षड्रात्रोत्सवाला सुरुवात झाली, आणि आज म्हणजेच चंपाषष्ठीला (Champa Shashthi) या उत्सवाची सांगता झाली आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टीला खंडोबा यांनी ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध केला, अशी आख्यायिका आहे. पाच दिवसांच्या उपासनेनंतर सहाव्या दिवशी म्हणजे आज हा उपवास सोडायचा दिवस आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रासह जेजुरीमध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर दुमदुमत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष हा उत्सव साजरा करण्यात आला नाही. पण यावर्षी जेजूरी गडावर अगदी धुमधडाक्यात चंपाषष्ठी साजरी होत आहे.


चंपाषष्ठीची आख्यायिका
पौराणिक कथेनुसार, मणिसुर आणि मल्लासुर या दोन राक्षसांनी मानव, देव आणि ऋषींना खूप त्रास दिला. असुरांचा त्रास असहय्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकराचा धावा केला. त्यानंतर भगवान शंकराने भगवान खंडोबाचे रूप धारण केले, त्यानंतर मणि आणि मल्ल यांच्या सोबत भगवान खंडोबा यांनी युद्ध केले. हे युद्ध सलग सहा दिवस सुरु होते. या भीषण युद्धात मणिने भगवान शिवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला. असुरांवरील विजयाचा आनंद म्हणून त्या काळापासून चंपाषष्ठी ही धार्मिक दृष्ट्या साजरी केली जाते.


सहा दिवस तेलाचा दिवा
चंपाषष्ठीला विशेष महत्त्व असून या दिवशी खंडेरायाची पूजा केली जाते. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबा मंदिरात मार्तंडभैरव षड् रात्रोत्सव साजरा केला जातो. अमावास्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत संपूर्ण सहा दिवस भाविक लवकर उठून मंदिरात खंडोबाच्या मूर्तीसमोर सहा दिवस तेलाचा दिवा लावतात. त्यानंतर चंपाषष्ठीला तळी उचलली जाते.



'तळी भंडारा' - एक कुळाचार
भगवान महादेवाचे अवतार खंडोबा यांनी 'मणि आणि मल्ल' या दैत्यांचा पराभव केला होता. त्यामुळे ऋषिमुनीं आनंदी झाले, मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला होता. त्याचेच प्रतीक म्हणजे 'तळी भंडारा' मानले जाते. त्यामुळे चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरली जाते. हा एक कुळाचार मानला जातो. ताम्हणात विड्याची (नागवेलीची) पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आदी साहित्य घेऊन तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये घरातील पुरुष मंडळीनी एकत्र येत 'येळकोट, येळकोट, जय मल्हार' च्या गजरात ही तळी वर खाली उचलतात. त्यानंतर जमीनावर पान ठेवून तळी ठेवली जाते. देवाला भंडार वाहिला जातो. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तळी उचलली जाते. शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. आरती करून भंडारा आणि गुळ-खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो.


चंपाषष्ठी म्हणजे त्रासापासून मुक्‍तीचा दिवस


चंपाषष्ठी म्हणजे, त्रासापासून मुक्‍तीचा दिवस. आनंदाचा दिवस. चंपाषष्ठी यात्रेसाठी भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. यात्रेत भाविकांची मोठी रांग लागते. घरातील सर्व मंडळी मोठ्या उत्‍साहाने सोहळ्यात सहभागी होतात. चंपाषष्ठी निमित्त जेजूरी गडावर हवन आणि अभिषेकाचा कार्यक्रम पार पडतो. शारदीय आणि चैत्र नवरात्री प्रमाणेच खंडोबा नवरात्री मध्ये देखील घटस्थापना करण्याची, प्रत्येक दिवशी एक एक माळ वाढवण्याची प्रथा आहे. 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता