Cardiac Deaths could be tied COVID: मागील काही दिवसांपासून हृदय विकारामुळे (हार्टअॅटक) मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तुमच्या आजूबाजूलाही अनेकांचा हार्टअॅटकमुळे मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. अचानक, पार्टीमध्ये, लग्नामध्ये, मार्केटमध्ये, व्यायाम करताना, डान्स करताना हार्टअॅटक आल्यानंतर गेल्या काही दिवसांत अनेकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुणांचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलेय. अचानक हार्ट अॅटकमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत डॉक्टरांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अचानक हार्टअॅटक येण्याचा संबंध कोरोना विषाणूशी असू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलेय.
एम्समधील कार्डियोलॉजीचे प्रोफेसर डॉ. राकेश यादव म्हणाले की, अचानक हार्ट अॅटकला लॉन्ग कोविडसोबत जोडलं जाऊ शकतं. " सध्या स्थितीला अचानक हार्ट अॅटकमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलेय. मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं ठोस कारण आणि डेटा उपलब्ध नाही. पण गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना पाहाता याचा संबंध कोरोना महामारीशी असू शकते."
2020 मध्ये IHJ ने केला होता दावा -
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रोफेसर डॉ राकेश यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2020 मध्ये इंडियन हार्ट जर्नल (IHJ) यामध्ये एक लेख प्रकाशित केला होता. त्यामध्ये कोरोनामुळे अचानक हार्ट अॅटकचं प्रमाण मोठ्या प्रमाण वाढेल अन् त्यामुळे मृत्यू मोठ्या प्रमाणात होतील, असे सांगितलं होतं. तसेच यामध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या कारणाचा उल्लेखही करण्यात आला होता. यामध्ये अनियमित हृदय गती आणि कमकुवत हृदयाचे स्नायू यांचा समावेश करण्यात आला होता.
'लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका'
एम्सचे प्रोफेसरने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, काही कालावधीनंतर कोरोना संक्रमणाचा इतिहास आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा वाढता धोका यांच्यातील दुव्याचे पुरावे वाढले आहेत. त्यामुळे लोकांनी हृदयाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, तसेच फिटनेसकडे लक्ष द्यावे. हृदय विकाराचा धोका कमी करण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. हृदयच्या संबंधित लक्षणाकडे दुर्लक्ष करु नये. लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या...
'अशा घटनाचं पोस्टमार्टम व्हायला हवं'
एम्समधील फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकोलॉजीचे प्रोफेसर आणि प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांच्यानुसार, "हृदयासंबधित आजार अथवा अन्य कारणांमुळे हृदय विकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झालेल्या तरुणांचे पोस्टमार्टम केले पाहिजे. यामुळे मृत्यूचं कारण समजण्यास मदत होईल. जर मृत्यू अज्ञात हृदयाच्या आजारामुळे झाला असेल, तर कुटुंबाला सावधानता म्हणून स्क्रीनिंग करण्यास सांगितले जाऊ शकते. यामुळे आजारांसदर्भात माहिती मिळू शकेल.