पुणे: नवीन वर्षामध्ये पुण्यातील एका हॉटेलने खाद्यप्रेमींना आणि बुलेट प्रेमींना एक आव्हान दिलंय. मुंबई-पुणे जुन्या हायवेलगत असणाऱ्या वडगाव जवळील 'शिवराज' हॉटेलने दिलेलं आव्हान ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे विस्फारतील हे नक्की. 'बुलेट थाळी चॅलेंज' असे या आव्हानाचे नाव आहे. या हॉटेलची महाकाय 'बुलेट थाळी' संपवा आणि त्याबदल्यात एक नवी कोरी रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा, अशा प्रकारचं आव्हान देण्यात आलं आहे.


या हॉटेलच्या दारात प्रत्येकी 1.70 लाख रुपयांच्या पाच नव्या कोऱ्या रॉयल एन्फिल्ड उभ्या असलेल्या दिसतात. शिवराज हॉटेलचे मालक अतुल वाईकर यांच्या डोक्यात ही कल्पना आली. लागोलाग त्यांनी याची अंमलबजावणी करत खाद्यप्रेमी आणि बुलेट प्रेमींना आव्हान दिलं.


शिवराज हॉटेलचे मालक अतुल वाईकर यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं की, ''ही बुलेट थाळी दोन आठवड्यापूर्वी सुरु करण्यात आली आहे. बुलेट थाळी एका व्यक्तीने एका तासाच्या आत संपवल्यास त्याला नवी कोरी रॉयल एन्फिल्ड भेट देण्यात येणार आहे."



अमरावतीत 'पवार' नॉनव्हेज आणि 'फडणवीस' व्हेज थाळीची धूम!


बुलेट थाळीबद्दल अधिक माहिती सांगताना अतुल वाईकर म्हणाले की, "साधारणत: चार लोक खाऊ शकतील अशी ही बुलेट थाळी आहे. या थाळीमध्ये चार पापलेट, चार सुरमई, चार चिकन लेग पिस, कोळंबी करी अर्धी हंडी, मटन मसाला अर्धी हंडी, चिकन मसाला अर्धी हंडी, कोळंबी बिर्याणी एक प्लेट, चार भाकरी, चार रोटी, सुकट अर्धी प्लेट, कोळंबी कोळीवडा, बिस्लेरी चार बाटल्या, रायता एक मोठी वाटी, सोलकडी चार वाट्या, रोस्टेड पापड चार आणि मटन अळणी सूप चार वाट्या असे या बुलेट थाळीचे स्वरुप आहे.


एकट्याने ही थाळी एका तासात संपवायची आहे. या थाळीची किंमत 2500 रुपये इतकी आहे. दोघांसाठीही ही ऑफर आहे पण वरील मेन्यूमध्ये दुप्पटीने वाढ होईल, म्हणजेच प्रत्येक पदार्थ डबल होईल.. त्याची किंमत 4444 रुपये इतकी आहे.



ही कल्पना कशी सुचली याबद्दल सांगताना अतुल वाईकर म्हणाले की, "लॉकडाऊनच्या काळात जवळपास आठ महिने हॉटेल बंद होते. लॉकडाऊन उठवल्यानंतर सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा कमी प्रतिसाद होता. त्या आधी 'रावण थाळी 'साठी हे हॉटेल प्रसिध्द होते. त्यावरुन आता 'बुलेट थाळी' ची कल्पना सुचली. दुसरं म्हणजे ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा एक मार्ग आहे. बुलेट थाळीच्या या चॅलेंजमुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित झाले आहेत."


कोरोनामुळे पतीचा रोजगार गेला.. पण, पत्नीच्या पाककलेनं तारलं!


बुलेट थाळीचे हे आव्हान घ्यायला रोज अनेक खवय्ये येतात. पण बुलेट थाळीचा आकार पाहिल्यानंतर अनेकजण त्यातून माघार घेतात. तरीही साधारण: रोज 15 खवय्ये हे आव्हान स्वीकारतात. पण आतापर्यंत केवळ एकाच खवय्यानं हे आव्हान जिंकलं आहे.


या व्यतिरिक्त इथे स्पेशल रावण थाळी आहे. ही थाळी चार लोकांनी संपवली तर पाच हजारांचे रोख बक्षिस आणि वर थाळीचे बिल माफ करण्यात येणार आहे. तसेच बकासुर थाळी, सरकार थाळी, पहिलवान थाळी आणि फिश थाळी अशा इतरही थाळ्या उपलब्ध आहेत.


थोडक्यात काय, बुलेट थाळी ही खवय्ये आणि बुलेट प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.


पहा व्हिडीओ: Hind kesari Thali | पाच हजारांची 'हिंदकेसरी' थाळी | ABP Majha