Imli Leaves Benefits: चिंच म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिंचेचा वापर सर्रासपणे अनेक घरांमध्ये केला जातो. चिंच चवदार असण्यासोबतच अनेक गुणांनी देखील परिपूर्ण आहे. मात्र आज आपण चिंच नव्हे तर त्याच्या पानांच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत. ज्यामध्ये चिंचेसारख्या अनेक घटकांचा समावेश आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. चिंचेच्या पानाचा चहा खूप फायदेशीर असतो. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत..


चिंचेच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट, मलेरियाविरोधी आणि दमाविरोधी गुणधर्म असतात. जे आपले यकृत आणि पोट दोन्हीसाठी फायदेशीर असतात, महत्वाचं म्हणजे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चिंचेच्या पानांपासून बनवलेला चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा चहा आपल्या एक नाही तर एकाचवेळी अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरतो.


चिंचेच्या पानांच्या चहाचे फायदे ( Benefits of Tamarind Leaves Tea) 


वजन कमी करणे


चिंचेची पाने वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. त्यात हायड्रोक्सिल अॅसिड आढळते. जे आपले पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरते.


मधुमेह:
चिंचेच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे मधुमेह नियंत्रणात प्रभावी ठरू शकतात. यासोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही हे उपयुक्त आहे. म्हणूनच याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
 
रोग प्रतिकारशक्ती:
चिंचेच्या पानांमध्ये इम्युनोमोड्युलेटरी आणि व्हिटॅमिन सी आढळते जे आपली प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि शरीराला अनेक रोगांशी लढण्यासाठी तयार करते.


चिंचेच्या पानांचा चहा कसा बनवायचा
 
सामग्री:


पाणी - 2 कप
चिंचेची पाने - 1 मूठभर
आले - 1/2 इंच
हळद - 2 चिमूटभर
मध - 2 चमचे
पुदिन्याची पाने - 3 ते 4
  
चहा कसा बनवायचा:


सर्व प्रथम चिंचेची पाने नीट धुवून घ्या. यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात किसलेले आले, चिंचेची पाने, हळद, पुदिन्याची पाने घालून 4-5 मिनिटे उकळू द्या. यानंतर ते गाळून एका कपमध्ये काढा आणि थोडे थंड झाल्यावर त्यात मध मिसळून प्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.