मुंबई : वजन वाढवण्यासाठी केळं खाण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो. मात्र या केळ्याचे इतरही फायदे आहेत. चेहऱ्याला तजेला आणण्यापासूव कोरड्या केसांना नवी लकाकी देण्यापर्यंत केळ्याचे विविध उपयोग आहेत. इतकंच नाही, तर केळ्याची साल दातांचा पिवळेपणा घालवण्यापासून चटका लागल्यावर होणारी जळजळ थांबवण्यापर्यंत अनेक वेळा उपयुक्त ठरते.

बहुगुणी केळं

1. केळं कुस्करुन त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा. हा फेसपॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा धुवावा. यामुळे त्वचा टवटवीत होण्यासोबतच तजेलदारही होते.

2. कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येवर सोपा उपाय करण्यासाठी दोन केळ्यांची पेस्ट तयार करावी. त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि तीन मोठे चमचे मेयोनिज टाकून त्याचं मिश्रण तयार करावं. हे मिश्रण केसांवर लावावे. अर्ध्या तासानंतर चांगल्याप्रकारे केस धुवावेत. यामुळे कोरड्या आणि निर्जीव केसांना नवीन लकाकी मिळेल.

3. हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याचे प्रमाण वाढते. या भेगांवर मलम लावून उपचार केले जातात. त्याऐवजी केळ्यांचा वापर करुन नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी उपाय करता येऊ शकतो. यासाठी केळी, मध आणि लिंबाचे मिश्रण पायाच्या भेगा भरण्यासाठी उपयुक्त असते. पिकलेलं केळं कुस्करुन दोन-तीन चमचे मध आणि लिंबाचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन घ्या. हे मिश्रण भेगा पडलेल्या टाचांवर लावून ठेवा. एक तासानंतर पाय कोमट पाण्याने धुवून घ्या. एक दिवसाआड पायांना असे मिश्रण लावल्यास टाचेच्या भेगा भरुन येण्यास मदत होते.

4. पचनाशी निगडीत त्रास असेल, तर केळे खाण्याचा फायदेशीर ठरते. कारण केळ्यामधील फायबर्ससारखे घटक शौचाला साफ होण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी नक्की केळे खावे.

5. केळ्यामधील विशिष्ट घटक शरीराला ऊर्जा देतात. यात शर्करेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे शरीर कमाकणाऱ्या लोकांना रोज भरपूर केळी खाण्यास सांगितले जाते. त्यामुळे दुधासोबत एक केळे खाल्ल्यास कमी काळात जास्त ऊर्जा मिळते.

6. केळे खाल्ल्याने रक्तवाहिन्यातील रक्त पातळ होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. केळ्यातील मॅग्नेशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि रक्त गोठून राहत नाही. त्यामुळे ज्यांना रक्त गोठण्याचा त्रास आहे त्यांनी केळे खाल्ले तर फायदा होतो.

7. केळ्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असणाऱ्यांनी नियमित केळे खावे. त्यामुळे अॅनिमियाचा त्रास उद्भवत नाही.

8. जुलाब झाले असतील तर ते थांबण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. त्यातच एक म्हणजे केळे खायला सांगितले जाते. लंघन करुन दिवसातून दोन ते तीन वेळा अर्धे-अर्धे केळे खाल्ल्यास जुलाबावर चांगला परिणाम होतो.

9. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची पिवळी साल गुणकारी आहे. केळीची साल दोन मिनिटे दातांवर घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.

10. स्वयंपाकघरात काम करताना चटका लागल्यास त्यावर केळ्याची साल लावावी. त्यामुळे चटका लागल्यावर होणारी जळजळ थांबते आणि आराम मिळतो. तसेच चटक्यामुळे त्वचेवरील डाग लवकर निघून जातो.