मुंबई : विकिशा अर्थात विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांचा शाही विवाहसोहळा अंबानींच्या वर्ताण होता, हे 'तुला पाहते रे'चा चाहतावर्ग मान्य करेल. पण ही लगीनघाई मालिकेला आणि पर्यायाने 'झी मराठी'ला भोवली की काय, असा प्रश्न आता पडत आहे. कारण लग्नानंतर घडणाऱ्या घडामोडींमुळे मालिकेचा टीआरपी घसरला आहे.
मिस्टर अँड मिसेस सरंजामेंच्या आयुष्यात घडामोडी सुरु आहेतच, पण याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर पडला आहे.
लग्न उत्तम झालं म्हणून मागच्या आठवड्यात भरगच्च टीआरपी मिळाला आणि मालिका नंबर 1 ला गेली. पण लग्नानंतर जे काही सुरु आहे, त्यामुळे हा टीआरपी घसरला आणि मालिका तिसऱ्या नंबरवर आली.
विक्रांतचा वैरी जालिंदर का कोण परत काय आला. इशाच्या बाबांनी लग्नाचा अर्धा खर्च द्यायचा म्हणून कोणालाही काहीच न कळवता घर काय विकलं आणि आता तर लिमिटच... सरंजामेंच्या घरात हळदीकुंकवाला गेलं असताना निमकरांनी हद्दच केली. देण्यासाठी आणलेले पैसै चक्क हॉलमध्ये एका कोपऱ्यात हळूच लपवले.
'काय हा बालिशपणा!' 'काहीही काय दाखवतायत मालिकेत' ही रिअॅक्शन आहे मालिका बघणाऱ्या तमाम प्रेक्षकांची. त्याचाच परिणाम म्हणजे टीआरपी घसरला.
खरं तर मालिकेच्या टायटल साँगमध्ये दिसणारी शिल्पा तुळसकर म्हणजेच विक्रांतची पहिली बायको राजनंदिनी सगळ्यांच्या कुतूहलाचा भाग आहे. आता लग्नानंतर तरी तिची चाहूल लागेल, असं वाटत असताना हे भलतंच प्रकरण सुरु झालं आहे.
मालिकेत एखादा ट्रॅक प्रेक्षकांना आवडला, की तो वाढवला जातो. पर यहां तो उलटी गंगा बह रही है... आता लग्न झालं विक्रांत-इशाचं...म्हणजे आता त्यांच्या लव्ह स्टोरी मधला इंटरेस्ट कमी झालाय... आता राजनंदिनी आणि त्या बंद दरवाजाबद्दल प्रेक्षकांना जास्त रस आहे.
झी मराठीच्याच मालिका पाहिल्या, तर होणार सून मी या घरची, राधा ही बावरी, लागिरं झालं जी... या सगळ्या मालिकांचा टीआरपी जोडप्यांच्या लग्नानंतर कमी झालेलाच दिसला आहे. आता काही अपवादही असतात, उदाहरणार्थ आपल्या राणादाची 'तुझ्यात जीव रंगला' मालिका. यावेळी दुसऱ्या नंबरवर हीच मालिका आली. देशात जसं इलेक्शनचं वातावरण आहे, अगदी तसंच मालिकेतही आहे.
सांगण्याचा हेतू हाच की आता प्रेक्षकही चॉईस करायला शिकले आहेत. मालिका आवडते म्हणून वाट्टेल ते बघत बसण्यापेक्शा मालिकेतला विषय आवडेनासा झाला की मालिका चेंज किंवा चॅनेल चेंज... त्यामुळे निर्मात्यांनी वेळीच सावध झालेलं बरं!
'तुला पाहत नाही रे!' विकिशाच्या लग्नानंतर टीआरपी घसरला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jan 2019 08:06 PM (IST)
विकिशाचं लग्न उत्तम झालं म्हणून मागच्या आठवड्यात 'तुला पाहते रे' मालिकेला भरगच्च टीआरपी मिळाला आणि मालिका नंबर 1 ला गेली. पण लग्नानंतर जे काही सुरु आहे, त्यामुळे हा टीआरपी घसरला आणि मालिका तिसऱ्या नंबरवर आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -