मुंबई : महाराष्ट्राच्या स्थापनेला आता तब्बल 62 वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. हा लढा यशस्वी करण्यामागे अनेकांचा हात होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि पोवाडा, शाहिरी हे अतूट नातं आहे आणि शाहिरी म्हटलं तर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. 'माझी मैना गावावर राहिली' या आण्णाभाऊंच्या छक्कडचा आवाज हा शाहीर अमर शेख हेच होते. 


अमर शेख यांचं मूळ नाव मेहबूब शेख पटेल. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1916 साली बार्शी या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव मुनेरबी असं होते, त्या कवियित्री होत्या. त्यामुळे मराठी लोकगीतांचा वारसा हा त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाला होता. 


परिस्थितीमुळे त्यांनी पडेल ते काम करायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या बारा वर्षापासूनच त्यांना गिरणीमध्ये काम करावं लागलं. पण हीच गोष्ट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्या काळात महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट चळवळ जोरात होती. कामगारांचं, कष्टकऱ्यांचं आयुष्य त्यांनी अगदी जवळून पाहिलं. कामगार चळवळीत ते गाणं गाऊ लागले. 


कोल्हापूरचे शाहीर हैदर लहरी त्यांचे आदर्श होते. शाहीर हैदर लहिरींनी रशियन क्रांतीवर लिहिलेल्या पोवाड्याची भूरळ अमर शेखना पडली. ते विविध ठिकाणी कार्यक्रम करून इंग्रज आणि भांडवलदारांविरोधात जनजागृती करू लागले. 1939 साली त्यांना अटक करण्यात आली 18 महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली.  कोल्हापुरात गेल्यानंतर त्यांच्या मित्रांनी अमर शेख असं नामकरण केलं. अशा पद्धतीने मेहबूब शेख पटेलचा अमर शेख झाला. पुढे जाऊन कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.


संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची ठिणगी पेटली
देश स्वतंत्र झाल्यानंतर भाषिक आधारावर संयुक्त महाराष्ट्र राज्याची मागणी सुरू झाली आणि अमर शेख यांनी या लढ्यात भाग घेतला.  शाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या साथीने शाहीर अमर शेख यांनी आपल्या बुलंद आणि पहाडी आवाजाने या लढ्यात एक प्रकारची जान आणली. आण्णा भाऊ साठे आणि अमर शेख हेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आवाज होते. अण्णाभाऊ साठे आणि द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत त्यांनी 'लाल बावटा कला पथका'ची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी रान उठवलं. 'माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली...' या अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या गीताचा आवाज अमर शेख बनले होते.


शाहीर अमर शेख यांची ग्रंथसंपदा
शाहीर अमर शेख यांनी कलश (1958) आणि धरतीमाता (1963) हे काव्यसंग्रह लिहिले. पहिला बळी (1951) हे त्यांनी नाटक लिहिले. युगदीप आणि वख्त की आवाज या मासिकांचे त्यांनी संपादन केले. 'प्रपंच' आणि 'महात्मा ज्योतिबा फुले' या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. 


'समाजवादी शिवछत्रपती' किंवा 'अमर अभिलाषा' हा त्यांचा गाजलेला पोवाडा. छत्रपती शिवरायांनी आपलं राज्य हे समतेच्या आधारावर बनवलं आणि खऱ्या अर्थाने समाजवादाची पायाभरणी केली अशी मांडणी शाहीर अमर शेख यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून केली.


"अमर शेख हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या भारत देशाचे शाहीर होते. अमर शेखांची शाहिरी केवळ एका चळवळीपुरती मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील तसेच देशातील कामगार, दलित, बहुजन, महिला, कष्टकरी यांची हाल-अपेष्टा आणि कष्टाच्या बेडीतून सुटका करवून देणारी आहे. अमर शेखांच्या शाहिरीला आपण एका पक्षाच्या चौकटीत बंदिस्त करू शकत नाही. राजकीय संघटना म्हणून जरी ते कम्युनिस्ट पक्षाशी निगडित असले तरी त्यांच्या काव्यातून त्यांनी मांडलेले विचार हे सर्व जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच आहेत." असं लोककलावंत गणेश चंदनशिवे यांनी बीबीसी या माध्यमाशी बोलताना सांगितलं होतं.