पुणे : दहावी, बारावी ते पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसह आयटीआय डिप्लोमा धारकांसाठी महिंद्रा अँड महिंद्रा या नामांकित कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनं पुण्यातील चाकण येथील यूनिटमध्ये नवोदित युवकांना ट्रेनी या पदावर काम करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 


दहावी, बारावी, पदवी, आयटीआयमधील डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिक मेकॅनिकल, एमटीए, पेंटर्स, मशिनिस्ट, वेल्डर,सीओई, सीओपीए डिप्लोमा  धारक आणि चार चाकी आणि अवजड वाहनांचे चालक यांना ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी आहे. 


ट्रेनी पदासठी ज्या तरुण तरुणींना अर्ज दाखल करायचे आहेत त्यांचं वय 18-28 दरम्यान असणं आवश्यक आहे. चालक पदासाठी जे तरुण अर्ज करतील त्यांना मात्र वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. 


महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून ज्यांना काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी कंपनीच्या पुण्यातील चाकण एमआयडीसीतील कार्यालयात अर्ज, चार फोटो आणि मूळ कागदपत्रांसह सकाळी 8 ते 11 यावेळात अर्ज उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 


तरुणांसाठी चांगली संधी


पुण्यात महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या नामांकित कंपनीत ट्रेनी म्हणून काम करण्याची तरुणांसाठी चांगली संधी आहे. करिअरच्या सुरुवातीला नामांकित कंपनीत काम केल्याचा फायदा संबंधित उमेदवारांना भविष्यात होऊ शकतो. 


महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  


 महाराष्ट्रात राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. या योजनेतून देखील दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना अप्रेंटिसची संधी मिळणार आहे. या  तरुणांना राज्य सरकारकडून मानधन दिलं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीनं अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली होती. अप्रेंटिस करणाऱ्या युवकांना तरुणांना राज्य सरकार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या नुसार मदत केली जाणार आहे. बारावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना सहा हजार,डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना 8 हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिलं जाईल. 


 दरम्यान, या योजनेनुसार राज्यातील विविध कार्यालयांकडून आणि आस्थापनांकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थी त्यांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेऊ शकतात. 


इतर बातम्या :



RRB JE Recruitment 2024: रेल्वेतील ज्युनिअर इंजिनिअर पदाच्या 7951 जागांसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, 44 हजारांपर्यंत पगार मिळणार