Suryakumar Yadav Catch T20 World Cup: टीम इंडियाने गेल्या दोन महिन्यांआधी आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात 7 धावांनी टीम इंडियाने विजय मिळवला. या सामन्यात निर्णयाक क्षण ठरला तो म्हणजे सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) अप्रतिम झेल. सूर्यकुमार यादवच्या या झेलने संपूर्ण सामनाच फिरवून टाकला. सूर्यकुमारने घेतलेल्या या झेलवरुन वाद देखील निर्माण झाला होता.
आता दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू तबरेझ शम्सीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरुन पु्न्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तबरेझ शम्सीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सूर्यकुमार यादवच्या (Suyakumar Yadav) झेलवर वक्तव्य केलं. एक व्हिडीओ शेअर करताना तबरेझ शम्सीने म्हणाला की, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये झेल तपासण्यासाठी त्याने ही पद्धत वापरली असती तर कदाचित नॉट आऊट दिले गेले असते.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
तबरेझ शम्सीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक स्थानिक क्रिकेट मॅच खेळताना दिसत आहेत. यावेळी सीमारेषेवर एक खेळाडू झेल घेतो. मात्र या झेलवरुन मैदानात उपस्थित असणारे खेळाडू आक्षेप घेतात. त्यानंतर एक रस्सी घेत सर्व मोजमाप करण्यास सुरुवात करतात.
पोस्टनंतर तबरेझ शम्सी ट्रोल-
तबरेझ शम्सीची पोस्ट व्हायरल होताच लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर शम्सीने स्पष्टीकरण दिले आणि म्हटले की हा फक्त एक विनोद आहे.
नेमकं प्रकरण काय?
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. रोहित शर्मानं बॉल हार्दिक पांड्याच्या हातात दिला होता. स्ट्राईकवर आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलर होता. हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर 20 व्या ओव्हरमध्य सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या डेव्हिड मिलरच्या कॅचमुळं कोट्यवधी भारतीयांचं टी 20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. सूर्यकुमार यादवनं घेतलेला अफलातून कॅच गेमचेंजर ठरला होता. याच कॅचचे व्हिडीओ दाखवून दावे प्रतिदावे करण्यात आले होते. सूर्यकुमार यादवनं घेतलेल्या ऐतिहासिक कॅचवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. सूर्यकुमार यादवचं बूट सीमारेषेवरील कुशनला लागल्याचा दावा काही जण करत वाद निर्माण करत होते. मात्र झेलवेळी सूर्यकुमार यादवचा पाय सीमा रेषेला लागला नव्हता, तर सीमा रेषेपासून दूर होता, हे स्पष्ट झालं होतं.
संबंधित बातमी:
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होताच पाकिस्तानची भाषा बदलली; खिलाडूवृत्तीचं उदाहरण देत भूमिका केली स्पष्ट!