Corporate Houses are Hiring : सध्या जागतिक मंदीच्या सावटामुळे नोकरकपातीचं (Layoff) संकट घोंघावत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ दिला जात आहे. असं असताना काही दिग्गज कंपन्यांकडून नोकरभरती केली जात आहे. विशेषत: फ्रेशर्ससाठी ही भरती केली जात आहे, ज्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालं आहे. ऐन नोकरकपातीच्या काळात काही कंपन्यांकडून नोकरभरती केली जात आहे. यामध्ये आयटी सेक्टर आघाडीवर आहे.


ऐन नोकरकपातीच्या काळात दिलासा


सुरुवातीला टेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यात आली. त्यानंतर इतरही अनेक क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं. अनेक टेक कंपन्या आणि स्टार्टअप्सने हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं. मात्र भारतात अशा काही कंपन्या आहेत, ज्या सध्या नोकरकपातीच्या काळातही नोकरदारांना संधी देत आहेत.


फ्रेशर्सना नोकरीची संधी


Naukri.com पोर्टल च्या JobSpeak च्या फेब्रुवारी 2023 च्या अहवालानुसार, भारतातील जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यामध्ये नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. अहवालानुसार, कंपन्यांकडून 8-12 वर्षे आणि 16 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे सध्या फ्रेशर्सना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.


'या' टेक आणि आयटी कंपन्यांकडून नोकरभरती


प्राईस वॉटरहाऊस कूपर्स (Price Waterhouse Coopers)


भारतातील आपल्या कामकाजाचा विस्तार करण्यासाठी, अकाऊंटिंग आणि कन्सल्टन्सी फर्म प्राईस वॉटरहाऊस कूपर्स इंडियाने पुढील पाच वर्षांमध्ये 30,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीच्या दिलेल्या माहितीनुसार, भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या 80,000 पर्यंत वाढवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. सध्या भारतात प्राईस वॉटरहाऊस कूपर्सचे 50,000 हून अधिक कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी कंपनीने भुवनेश्वर, जयपूर आणि नोएडा येथे तीन कार्यालये उघडली. कंपनीकडून भारतामध्ये असोसिएट्सपासून व्यवस्थापकीय भूमिकांपर्यंत विविध स्तरांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.


इन्फोसिस (Infosys)


दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये 4263 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. नेटवर्किंग साइट लिंक्डइनने (LinkedIn) याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये इंजिनियर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सल्लागार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. 


एअर इंडिया (Air India)


एअर इंडिया आपला विस्तार वाढवण्याची योजना आखत आहे. त्यामुळे एअर इंडिया यावर्षी 900 हून अधिक नवीन पायलट आणि 4,000 हून अधिक केबिन क्रू मेंबर्सची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. कंपनी अधिक कर्मचारी आणि वैमानिक नियुक्त करणार आहे.


टीसीएस (TCS)


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) कडून सुमारे 1000 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल. टीसीएसचे मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली आहे. 


विप्रो (Wipro)


विप्रो कंपनीकडे भारतात 3292 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. लिंक्डइन वेबसाइटने ही माहिती दिली आहे. कंटेंट रिव्यूअस ते मार्केट लीड यासारख्या वैविध्यपूर्ण पदांवर भरती करण्यात येईल. याशिवाय ग्राहक सेवा, ऑपरेशन्स, इंजिनियरींग, आयटी आणि माहिती सुरक्षा, अकाऊंट अँड फायनान्स विभागांमध्येही भरती करण्यात येईल.