Hospitality and Tourism Sector: जागतिक मंदीच्या (Global Recession) सावटाचा परिणाम भारतातही (National News) दिसून येत आहे. अशातच काहीशी दिलासादायक बातमी म्हणजे, हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात येत्या 5 ते 7 वर्षांत तब्बल 5 कोटी रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. सरकारनं पाठिंबा दिल्यास हे लक्ष्य सहज साध्य करता येईल, असं हॉटेल्स असोसिएशन ऑफ इंडियानं (HAI) सोमवारी सांगितलं आहे. त्यासाठी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याची गरज आहे. हा पाठिंबा मिळाल्यास या क्षेत्रात कोट्यवधी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.
उद्योग आणि पायाभूत सुविधांचा दर्जा मिळणं आवश्यक
HAI अध्यक्ष पुनीत छठवाल यांनी सहाव्या HAI हॉटेलियर्स कॉन्क्लेव्हमध्ये सांगितलं की, हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधांचा दर्जा मिळण्याबरोबरच राहण्याची व्यवस्था, उत्पन्न आणि रोजगारही वाढेल. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ छठवाल म्हणाले की, पर्यटन हा विकासाचा आधारस्तंभ आहे. देशातील एकूण रोजगारामध्ये ते 10 टक्के योगदान देत आहे. याशिवाय, त्याचा जीडीपीमध्ये 8 टक्के वाटा आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या क्षेत्राला फक्त योग्य धोरणांची गरज आहे.
2 वर्षात नियुक्ती 271 टक्क्यांनी वाढली
रेडिसन हॉटेल ग्रुपचे चेअरमन एमेरिटस आणि एचएआयचे उपाध्यक्ष केबी काचरू म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत नोकरभरतीत 271 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भविष्यात 5 कोटी नोकऱ्यांचं उद्दिष्ट गाठता येईल. यावरून व्यवसायाची प्रगती झपाट्यानं होत असल्याचं स्पष्ट होतं. आता आपण प्रत्येक किंमत श्रेणीच्या पर्यटनावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. प्रत्येक उत्पन्न गटातील लोकांना सेवा पुरवायची आहे.
क्षेत्र आपली क्षमता सरकारपर्यंत पोहोचवण्यात अपयशी
यापूर्वी, अमिताभ कांत यांनी या क्षेत्रातील कंपन्यांना उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या स्थितीसाठी सरकारशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं होतं. पर्यटन उद्योग मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करत असल्याचे राजकारण्यांना सांगण्यास आतापर्यंत अपयशी ठरला आहे. ते म्हणाले की, थायलंडनं सुमारे 2 कोटी, मलेशियाने 1.5 कोटी आणि भारतात 78 लाख रोजगार पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण केले आहेत.