Mumbai Mahapalika Bharati 2024 : मुंबई : मुंबईच्या फुटपाथवरील वाढत्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयानं महापालिकेला फटकारलं होतं. त्यानंतर जून महिन्यात प्रशासनानं मुंबईत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईसाठी पालिकेनं वीस महत्त्वाची ठिकाणं निश्चित केली होती. त्यात चर्चगेट, सीएसएमटी परिसर, कुलाबा, दादर स्थानक परिसर, अंधेरी, बोरीवली अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या कारवाईवर भर देण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई थंडावली असून फेरीवाले पुन्हा दिसू लागले आहेत. 


महापालिकेसाठी फेरीवाल्यांना रोखणं हे आव्हान बनलं आहे. मनुष्यबळाअभावी या कारवाईत सातत्य ठेवणं अवघड बनलं आहे. त्यामुळे पालिका प्रशासनानं अतिक्रमण निर्मूलन निरीक्षक (परवाना निरीक्षक) पद भरण्याचं ठरवलं आहे. सध्या पालिकेकडे 207 परवाना निरीक्षक आहेत. आता त्यात आणखी 118 परवाना निरीक्षकांची पदं भरली जाणार आहेत. लिपिकांची परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून त्यातून ही पदं भरण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 


मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती


सध्या सरकारी नोकरदाराला चांगलंच डिमांड आलं आहे, त्यामुळे सरकारी नोकरीसाठी लाखो विद्यार्थी आपलं नशिब आजमवाताना दिसून येतात. कुणाला लग्नासाठी, कुणाला करिअरसाठी, कुणाला आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी तर कुणाला लोकांची सेवा करण्यासाठी सरकारी नोकरी पाहिजे, असते. त्यासाठी, सातत्याने अर्ज करुन उमेदवार नशिब आजमवतात. आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता नेमकी काय, कोणाला अर्ज करता येणार आणि किती अर्जसोबत किती फी भरावी लागणार याची माहिती आपण यात पाहणार आहोत.


अर्ज कुठे करायचा?


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. त्यानुसार, दिनांक 20 ऑगस्ट 2024  पासून दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटे वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.