Mumbai Ganeshotsav 2024 : मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्वाची तयारी सार्वजनिक मंडळाकडून जोरदार सुरू आहे. यंदाच्या गणेशोत्वात खड्डे त्याच बरोबर वाहतूक कोंडींचा त्रास नागरिकांना होऊ नये. या अनुषंगानं मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी पहिल्यांदाच नवी मुंबईतून मुंबई विमानतळपर्यंत 'ग्रीन कॉरीडोर' ही संकल्पना आखली आहे. तसेच, या 'ग्रीन कॉरीडोर'वरती वाहतुकीचा परिणाम होऊ नये, यासाठी टप्या टप्यावर अधिक मनुष्यबळही तैनात असणार आहे. 


नवी मुंबईतून (Navi Mumbai) गणेशोत्सवात (Ganeshotsav) पश्चिम उपनगरात (West Suburbs) जायचं म्हटलं, तर वाहतूक कोंडींचा सामना करत नागरिकांना 2 तासांचा प्रवास करावा लागतो. मग तुम्ही ठाणे मार्गे जा किंवा वाशी खाडीपूल मार्गे. वाहतुकीचा कालावधी दोन तासांहून अधिक लागतो. तर ठाण्यातून पूर्वद्रूतगती मार्गे मुंबईत यायचं झाल्यास 1 तास 20 मिनिटांचा कालावधी लागतो. हीबाब लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होऊ नयेत, या अनुषंगानं वाहतूक पोलिसांकडून मुंबईत एक 'ग्रीन कॉरीडोर' रस्त्यांची संकल्पना राबवली जाणार आहे. यात नवी मुंबईतील व्यक्ती अवघ्या 50 मिनिटात नवी मुंबईहून मुंबईच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठू शकणार आहे.


कसा असणार ग्रीन कॉरीडोर?



  • नवी मुंबईहून अटल सेतूद्वारे येणारी वाहनं पीडीमेलो रोडद्वारे सीएसएमटीच्या दिशेनं जातील

  • सीएसएमटीहून ही वाहनं मंत्रालय मार्गे मरीन ड्राईव्ह करत पुढे कोस्टलरोडच्या दिशेने जातील

  • कोस्टलरोडहून पुढे वांद्रे वरळी सीलिंक मार्गे, पश्चिमद्रूतगती मार्गे मुंबई विमानतळाला जाता येणार आहे. 


महत्त्वाची बाब म्हणजे, लालबागच्या राजाच्या दर्शनाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता. लालबाग उड्डाणपूलाखालील वाहतूक ही बंद केली जाते. यावेळी करीरोडचा नव्यानं झालेला उड्डाणपूल लक्षात घेता. दक्षिण मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरून येणारी वाहतूक ही लालबाग उड्डाण पुलाखालून भारतमाता सिग्नलहून करी रोडच्या दिशेनं वळवत पुढे ना. म. जोशी मार्गे दक्षिण मुंबईकडे वळवण्यात येणार आहे. शक्यतो भाविकांनी लालबाग राजाच्या दर्शनाला येताना लोकलनं यावं, असं आवाहन पोलिसांनी केलं असून वाहनं घेऊन आल्यास ती वाहनं लोढा पे अॅड पार्क किंवा कल्पतरू पे अॅड पार्कचा वापर करावा. दर्शनासाठी आलेल्यांनी रस्त्यांवर वाहनं उभी करून जाऊ नये, अशा गाड्यांवर कारवाईसाठी मोठ्या संख्येनं टोविंगव्हॅन या परिसरात तैनात राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.