Career Guide : 'इंटरव्ह्यू' ही आपल्या नोकरीच्या शोधातील किंवा नोकरी मिळवण्याच्या मार्गातील एक महत्त्वाची पायरी आहे. नोकरीचे नियुक्तीपत्र तुमच्या हातात पाडण्यासाठी इंटरव्ह्यू (Interview) उत्तम होणे खूप गरजेचे असते. या लेखात आम्ही काही मुद्यांची रुपरेषा सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होण्यास आणि इतरांपेक्षा सरस होण्यास मदत होईल.
यापैकी काही मुद्दे सामान्य वाटू शकतात, परंतु बरेच लोक अजूनही सामान्य चुका करतात ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. तर नक्की वाचा आणि तुमची पुढील इंटरव्ह्यू कसा द्यायचा ते शिका!
पाच सर्वात सामान्य आणि क्षुल्लक चुका ज्या जवळजवळ प्रत्येकजण इंटरव्ह्यू देताना करतो
आजकालची तरुण पिढी इंटरव्ह्यूला अगदी हलक्यात घेत आहे. त्यांचे वागणे कधीकधी असे दिसते की इंटरव्ह्यू घेणारा त्यांच्याबद्दल त्यांच्यापेक्षा अधिक गंभीर आहे.
इंटरव्ह्यूमध्ये अयशस्वी होण्याची आम्हाला आढळलेली काही स्पष्ट कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
उमेदवार इंटरव्ह्यूसाठी येताना पूर्वतयारी करत नाहीत
बहुतेक उमेदवारांचा असा विश्वास आहे की इंटरव्ह्यू ही केवळ त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वाचलेली गोष्ट आहे किंवा त्यांना वाटते की ते इंटरव्ह्यूला उत्तर देण्यास ते पुरेसे हुशार आहेत. अनेक उमेदवारांचा असा विश्वास आहे की त्यांना इंटरव्ह्यूची तयारी करण्याची गरज नाही. परिणामी, ते सहसा इंटरव्ह्यूसाठी तयारीशिवाय येतात.
उमेदवार योग्य प्रश्न विचारत नाहीत किंवा ते पुरेसे ठाम नसतात
बहुतेक उमेदवार प्रश्न विचारण्यास टाळाटाळ करतात किंवा कचरतात. पण इंटरव्यूमध्ये 'उत्तरे देणे' जेवढे महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे 'प्रश्न विचारणे' हे देखील आहे. प्रत्येक इंटरव्ह्यू घेणारा हा प्रश्न विचारतो - "तुम्हाला आमच्यासाठी काही प्रश्न आहेत का?" बहुतेक वेळा, उमेदवार या प्रश्नांसाठी तयार नसतात. मग ते विचारतात - "मला किती पगार मिळेल", "कामाचे दिवस काय आहेत", "मला प्रवास भत्ता मिळेल का" वगैरे. कोणताही उमेदवार हे विचारत नाही की - "या नोकरीतून मी काय शिकणार?" किंवा "मला माझे कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी कोणत्या संधी मिळतील?" उमेदवाराने विचारलेले प्रश्न त्याची मनोवृत्ती दर्शवतात आणि तुमची निवड तुमच्या वृत्तीनुसार, तुमच्या कौशल्यांवरुन केली जाते.
उमेदवार योग्य पोशाख करत नाहीत
इंटरव्ह्यूला येताना बहुतेक उमेदवारांकडून होणारी सामान्य चूक म्हणजे योग्य वेशभूषा न करणे. अनेक उमेदवार जीन्स, टी-शर्ट, चप्पल परिधान करुन येतात किंवा त्यांचा कोणताही ड्रेसकोड नसतो. पर्यटनाला जाताना घालायचे कपडे इंटरव्ह्यूला जाताना घातले तर कसे चालेल? व्यावसायिकतेला प्राधान्य देणारी कोणतीही कंपनी किंवा संस्था अशा पोषाखामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूमधून बाद करु शकते.
बहुतेक इंटरव्ह्यू म्हणजे औपचारिक घडामोडी असतात, त्यामुळे योग्य पोशाख करणे महत्त्वाचे आहे. अपवादात्मक ठिकाणी जीन्स, टी-शर्ट सारखा पोशाख स्वीकारलाही जाऊ शकतो मात्र तुमचा पोशाख आणि तुम्ही ज्या प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज केला आहे यामध्ये साधर्म्य असायला हवे.
मुद्दा सोडून बडबड करणे किंवा गरजेपेक्षा कमी बोलणे
पुरेशी माहिती प्रदान करणे महत्त्वाचे आहे जेणेकरुन इंटरव्ह्यू घेणाऱ्याला तुम्ही कोण आहात आणि तुमची उद्दिष्टे काय आहेत याची जाणीव होऊ शकेल. तथापि, जास्त माहिती न देणे देखील महत्त्वाचे आहे. तुमची उद्दिष्टे काय आहेत आणि तुम्हाला ही नोकरी का हवी आहे हे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना जाणून घ्यायचे असते. तुमचा प्रतिसाद संक्षिप्त मात्र पुरेसा असणे महत्त्वाचे आहे.
देहबोलीतून आत्मविश्वासाचा अभाव दर्शवणे
उमेदवाच्या देहबोलीतून आत्मविश्वास दिसणे गरजेचे असते. सहसा, उमेदवाराची देहबोली योग्य नसते. ते योग्यप्रकारे समोरच्याशी संपर्क करत नाहीत, उदा. इंटरव्ह्यू घेणारा बोलत असताना उमेदवार त्याच्याकडे न बघता इतरत्र पहात असतात.
त्यामुळे, इंटरव्ह्यू घेणारा उमेदवाराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. कमी आत्मविश्वासाच्या हावभावांमुळे, उत्तरे माहित असूनही इंटरव्ह्यू दरम्यान प्रश्नाचे उत्तर देताना उमेदवार अडखळतात. इंटरव्ह्यू देताना संपूर्ण देहबोली महत्त्वाची असते.
इंटरव्ह्यू दरम्यान होणाऱ्या चुका टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणते आहेत?
1. तुमचा अनुभव, शिक्षण आणि कौशल्य याविषयीच्या प्रश्नांसाठी तयार रहा. याची उत्तरे आत्मविश्वासाने द्या!
2. एक अद्ययावत आणि चांगला मसुदा तयार केलेला रेझ्युमे घेऊन जा. चांगला रेझ्युमे तुम्हाला नेहमी आत्मविश्वास देईल.
3. इंटरव्ह्यू घेणारांसोबत सुसंवादातून मैत्रीपूर्ण संबंध तयार करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल.
4. तुम्ही सार्वजनिक करु इच्छित नसलेली वैयक्तिक माहिती देऊ नका.
5. लक्षात ठेवा: इंटरव्ह्यू ही नियुक्ती प्रक्रियेतील फक्त पहिली पायरी आहे; त्यामुळे घाबरु नका.
6. तुमच्या इंटरव्ह्यू दरम्यान नेहमी प्रामाणिक आणि सत्य बोला. यामुळे तुम्ही विश्वासार्ह उमेदवार आहात हे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या लक्षात येईल.
7. नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जाताना साधे मात्र व्यावसायिक स्वरुपाचे कपडे परिधान करा. पोषाखामुळे तुमच्यात अवघडलेपणा येणार नाही याकडे लक्ष द्या.
8. याव्यतिरिक्त, कंपनीबद्दल इतर गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या संबंधीच्या प्रश्नांची तयारी करुन जाणे गरजेचे आहे.
9. सर्वात शेवटी, इंटरव्ह्यूला वेळेवर पोहोचा. यामुळे तुम्हाला तिथल्या वातावरणात स्थिर होण्यास पुरेसा वेळ मिळतो.
या सोप्या सूचनांचे अनुसरण करुन, तुम्ही इंटरव्ह्यूची पायरी यशस्वीरित्या पार पाडू शकता.
सारांश
इंटरव्ह्यू ही एक तुमच्या मनाची धाकधूक वाढवणारी किंवा तुमच्यावर दबाव आणणारी प्रक्रिया असू शकते, परंतु या सूचना लक्षात घेऊन, तुमची इंटरव्ह्यू यशस्वी होण्याची शक्यता आहे. लबाडीची किंवा अनाकलनीय उत्तरे देणे टाळण्याचे लक्षात ठेवा आणि त्याऐवजी प्रामाणिक आणि संक्षिप्त व्हा. या सोप्या सूचनांचे अनुसरण करुन, तुमचा इंटरव्ह्यूचा अनुभव आनंददायक आणि फलदायी होऊ शकतो. विसरु नका, इंटरव्ह्यू ही स्वत:चे मार्केटिंग करण्याची एक संधी असते आणि ते तुमच्या करिअरच्या दिशेने पहिले पाऊल असते.
- ऋषी पाटील, संस्थापक संचालक, एक्झिक्युटिव्ह 81
इतर महत्त्वाच्या बातम्या
Career Options After 12th : 12 वी नंतर वाणिज्य शाखेतील शिक्षणाच्या संधी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या