नवी दिल्ली : टाटा समुहामध्ये परत जाण्याची इच्छा नसल्याचं सायरस मिस्त्री म्हणाले आहेत. एनसीएलएटी म्हणजेच कंपनी लवादाने सायरस मिस्त्री यांच्या बाजुने निकाल देत पुन्हा टाटा सन्सचे संचालक बनवण्याचे आदेश दिले होते. याविरोधात टीसीएसने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिस्त्री म्हणाले की, त्यांनी नेहमीच कंपनीच्या कामकाजामधील उत्कृष्ट मानकांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले, टाटा समूहाचे हित कोणत्याही व्यक्तीच्या किंवा माझ्या स्वतःच्या हितसंबंधांपेक्षा महत्वाचे आहे.


सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीवर स्थगिती आणण्याची मागणी या याचिकेतून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे.

सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन झालेली हकालपट्टी बेकायदेशीर असून पुन्हा कंपनीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा नॅशनल कंपनी लॉ अ‍ॅपिलेट ट्रिब्युनलने (एनसीएलएटी) आदेश दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाचा आणि शेअरधारकांचा मिस्त्री यांच्यावर विश्वास राहिला नाही, असे सांगून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

टा उद्योग समूहाची धारक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्टोबर 2016 साली तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर मिस्त्री यांच्या जागी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. अवघ्या 42 व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना चार वर्षातच भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले हे बघून सर्वांनाच धक्का बसला होता.

एनसीएलटी ने आज दिलेल्या निर्णयानुसार सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय चुकीचा आहे. सायरस मिस्त्री टाटा सन्स समूहाचे सहावे अध्यक्ष होते. 2012 साली रतन टाटा यांच्यानंतर मिस्त्री यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला होता.