Marathi Serial : 'लक्ष्मीनिवास' (Lakshmi Niwas) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीच्या (Zee Marathi) अधिकृत सोशल मीडियावरुन मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या मालिकेत तुषार दळवी आणि हर्षदा खानविलकर हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका साध्या जोडप्याची ही गोष्ट आहे. त्यामुळे आता ही मालिका कधीपासून सुरु होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
झी मराठी वाहिनीवर सुरु झालेल्या नव्या मालिकांच्या प्रवाहात आता पुन्हा एकदा एका नव्या मालिकेची घोषणा झाली आहे. त्यामुळे या मालिकेमुळे आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे मालिकेच्या पहिल्या प्रोमोवर या जोडीसाठी उत्सुकताही दर्शवली आहे.
मालिकेचा प्रोमो शेअर
मालिकेचा नव्या प्रोमोमध्ये हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे त्यांच्या पात्रांची ओळख करुन देताना दिसत आहेत. तुषार दळवी म्हणतात की, मी श्रीनिवास, एका कार कंपनीमध्ये सुपरवाईजर आहे.कुटुंब वाढलं, जाबाबदाऱ्या वाढल्या,खर्चाची जुळवाजुळव करताना तारांबळ उडाली... पण अजूनही एक स्वप्न मी जपून ठेवलंय..माझ्या लक्ष्मीसाठी मला हक्काचं घर बांधायचं आहे.
हर्षदा खानविलकर म्हणतात की, मी लक्ष्मी...श्रीनिवासची लक्ष्मी...माझं एकच स्वप्न आहे..माझ्या मुलींची लग्न थाटामाटात व्हावीत आणि त्यांचे संसार सुखाचे व्हावेत... त्यानंतर ते एका बांधकाम सुरु असलेल्या घरापाशी येतात... तेव्हा हर्षदा खानविलकर म्हणतात की, काय रे निवास रमलास ना रे स्वप्नात.. त्यावर तुषार दळवी म्हणतात की, हे फक्त स्वप्न नाहीये लक्ष्मी तुला दिलेला शब्द आहे...तेव्हा हर्षदा खानविलकर म्हणतात की, होय पण आधी आपण आपल्या मुलींची लग्न करुयात आणि मग तुझं स्वप्न पूर्ण करुयात...त्यावर तुषार दळवी म्हणतात माझं नाही आपलं स्वप्न...