Pushkar jog : मराठी सिनेमांना मराठी प्रेक्षक येत नाही अशी खंत कलाकारांकडून नेहमीच व्यक्त केली जाते. त्याचप्रमाणे मराठीत चांगल्या पठडीतले सिनेमे फार कमी येतात, असा तक्रारीचा सूर मराठी प्रेक्षकांचा असतो. त्यामुळे प्रेक्षकांची तक्रार आणि कलाकारांची खंत हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा कलाकार यावर त्यांचं स्पष्ट मतंही व्यक्त करतात. नुकतच अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यानेही 'एबीपी माझा'सोबत बोलताना यावर त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. 


पुष्कर जोगचा  धर्मा : द एआय स्टोरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने पुष्करने नुकतच एबीपी माझासोबत संवाद साधला. पुष्कर या सिनेमाचा निर्माता असून त्यानेच दिग्दर्शनही केलं आहे. तसेच या सिनेमात त्याची महत्त्वाची भूमिका देखील आहे. पुष्करचा हा सिनेमा 25 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 


'मराठी प्रेक्षक दोन्हीकडून बोलतात'


मराठी सिनेमे एका पठडीच्या बाहेर जाणार नाही, असं प्रेक्षकांना वाटतं यावर तुझं मत काय असा प्रश्न पुष्करला विचारण्यात आला. त्यावर पुष्करने म्हटलं की,हो... असं आहे..मराठी प्रेक्षक दोन्हीकडून बोलतात. एकतर ते बोलतात प्रेक्षक नवीन काही देत नाही आणि दुसरीकडे त्यांना नवीन काही दिलं तर ते थिएटरमध्ये जाऊन पाहत नाहीत. काय होतं मराठी सिनेमा मराठी प्रेक्षकांच्या प्राधान्यक्रमात नाहीये. कारण बॉलिवूड आहे, दाक्षिणात्य सिनेमे आहेत.. नाटकाविषयी त्यांचं प्रेम आहे.. नाटकं हाऊसफुल्ल होतात.पण ते थिएटरमध्ये येत नाहीत. बॉलिवूडला माहितेय की महाराष्ट्र त्यांचा गड आहे. पुढच्या आठवड्यात दोन मोठे हिंदी सिनेमे येत आहेत. पण मग मराठी सिनेमे दिवळीत काय येत नाहीत? आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत हिंदीवाल्यांना आपण जास्त भाव देतो. 


हा माझ्यासाठी हार्टब्रेक - पुष्कर जोग


'दुतोंडी वागणारी लोकं आपल्याकडे खूप आहेत आणि हे ट्रोल वैगरे करणाऱ्या लोकांची जातच वेगळी आहे. मराठी अस्मिता वैगरे तेव्हाच बोला तुम्ही जेव्हा तुम्ही खरंच मराठीला पाठिंबा देताय. त्यामुळे माझ्यासाठी हे हार्टब्रेक आहे, की माझा सिनेमा प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन पाहत नाहीत.एक मराठी मुलगा मराठी प्रेक्षकांसाठी सातत्याने एक सिनेमे बनवून रिलीज करतोय आणि ते पाहायला तुम्ही थिएटरमध्ये नाही आलात तर माझ्यासाठी तो हार्टब्रेक आहे', असं म्हणत पुष्करने त्याची खंत व्यक्त केली आहे. 



ही बातमी वाचा : 


Swara Bhaskar : 'तुमच्या पदरी निराशा येणार नाही', नवऱ्याला उमेदवारी जाहीर होताच स्वरा भास्करची शरद पवारांसाठी खास पोस्ट