Ye Re Ye Re Pausa : ‘झुंड’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘नाय वरणभात लोन्चा’, ‘सोयरीक’ यांसारख्या अलीकडच्या मराठी, हिंदी चित्रपटांमधल्या जोरदार भूमिकांमुळे अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) चर्चेत आहेत. विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी फिट्ट बसतात. नुकताच येऊ घातलेला ‘येरे येरे पावसा’ (Ye Re Ye Re Pausa) हा मराठी चित्रपटही त्याला अपवाद नाही. त्यातील ‘जुबैदा’ ही व्यक्तिरेखा त्यांनी तेवढ्याच ताकदीने रेखाटली आहे.


पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावातील जुबैदा आपल्या छोटया घरात अडीअडचणींचा सामना करत परिस्थितीला तोंड देतेय. मात्र तिचा आत्मविश्वास तसूभरही ढळलेला नाही. या खडतर परिस्थितीशी दोन हात करायला ती कायम सज्ज असते. 17 जूनला ‘येरे येरे पावसा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शारीक खान यांची असून, दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे.


‘येरे येरे पावसा’ या चित्रपटाचा विषय भावला!


आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना त्या सांगतात, ‘मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काही वेगळेपण असेल, तर ते करायला आवडतं. येरे येरे पावसा या चित्रपटाचा विषय मला भावला. काही चित्रपटांचा आशय प्रेक्षकांना जगण्याचं लढण्याचं बळ देत असतो. येरे येरे पावसा हा चित्रपट याच पठडीतला आहे. लहान मुलांच्या माध्यमातून छोटीशी वाटणारी गोष्ट खूप रंजकपणे सांगण्यात आली आहे. माझ्यासोबत अभिनेते मिलिंद शिंदे मोहम्मद या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. आमच्या दोघांची जोडी यात आहे.



कलाकारांची फौज!


‘येरे येरे पावसा’ या चित्रपटात छाया कदम यांच्यासोबत मिलिंद शिंदे, संदेश जाधव,  विनायक पोतदार, आर्या आढाव, चिन्मयी साळवी, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले यांच्या भूमिका आहेत.


 ‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांनी ‘येरे येरे पावसा’ चित्रपटाची प्रस्तुती केली असून सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड झाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे.


संबंधित बातम्या


Ye Re Ye Re Pavasa : छोट्यांची मोठ्ठी गोष्ट सांगणारा 'येरे येरे पावसा'; 17 जूनला होणार प्रदर्शित


Ye Re Ye Re Pavasa : पुरस्कार पटकावून परदेशातही नाव गाजवणारा ‘येरे येरे पावसा’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला