मुंबई : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि वंडरवुमनच्या भूमिकेने सर्व जगाला भूरळ घालणाऱ्या गॅल गडोटने शाहीन बागच्या 'बिलकीस दादी'ला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गॅल गडोटने न्यूईयरच्या निमित्ताने वर्षभरात चर्चेत आलेल्या काही महिलांचे फोटो शेअर केले आहेत. या महिला तिच्या दृष्टीने 2020 मधील वंडर वुमन्स असल्याचं गॅल गडोटने सांगितलं आहे. अशातच तिने आपल्या या खास यादीमध्ये शाहीन बागमधील 'बिलकीस दादी' यांचाही समावेश केला आहे. या पोस्टमध्ये गॅल गडोटने इतरही अनेक महिलांचे फोटो शेअर केले आहेत. त्याचसोबत कॅप्शनमध्ये #MyPersonalWonderWomen हा हॅशटॅगही वापरला आहे.
वंडर वुमन गॅल गडोटची पोस्ट
आपल्या आयुष्यातील वंडर वुमन्सचे फोटो शेअर करत गॅल गडोटने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "2020 ला मागे सारताना माझ्या आयुष्यातील वंडर वुमन्सना माझ्याकडून खूप खूप प्रेम. यांमधील काही माझ्या आयुष्यातील अत्यंत जवळच्या महिला आहेत, काही माझ्या कुटुंबातील, तर काही मैत्रिणी आहेत. तसेच यामध्ये काही प्रेरणादायी महिला आहेत, ज्यांच्याबाबत ऐकून मला खरंच खूप आनंद झाला. तसेच यामध्ये काही अशा महिलाही आहेत, भविष्यात ज्यांची भेट घेण्याची माझी इच्छा आहे. आम्ही एकत्र येऊन चांगलं काम करु शकतो. तुम्हीही तुमच्या आयुष्यातील वंडर वुमन्स माझ्यासोबत शेअर करा."
शाहीन बागमधील 'बिलकीस दादी' व्यतिरिक्त गॅल गडोटच्या इतर वंडर वुमन्सबाबत बोलायचं झालं तर, त्यामझ्ये गॅलने तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला, कुटुंबातील काही महिला आणि तिच्या कुटुंबातील काही महिलांचा समावेश केला आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, वंडर वुमन चित्रपटाच्या दिग्दर्शिका पेटी जेन्किन्स, शाहीन बागची 82 वर्षीय बिलकीस बानो, वंडर वुमन चित्रपटात गॅलची स्टंट डबल असलेली Christiaan Bettridge यांच्यासोबतच काही इतर महिलांचाही समावेश आहे.
कोण आहे 'बिलकीस दादी'?
गेल्या वर्षी म्हणजेच, 2020 मध्ये शाहीन बागच्या आंदोलनात 'बिलकीस दादी'चं नाव खूप चर्चेत आलं होतं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीन बाग येथे पार पडलेल्या आंदोलनात 82 वर्षीय 'बिलकीस दादी'ने उपस्थित राहत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. एवढंच नाहीतर 'बिलकीस दादी'ला शाहीन बागची दादी म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीन बाग येथे आंदोलन सुरु होतं. दिवस-रात्र हे आंदोलन सुरु होतं. यावेळी बिलकीस दादी केवळ महत्त्वाच्या क्षणीच नाहीतर, सकाळपासून रात्रीपर्यंत या आंदोलनासाठी उपस्थित राहिली होती. तसेच त्यावेळी बोलताना या आंदोलनाला शेवटपर्यंत पाठींबा देणार असल्याचंही बिलकीस बानो यांनी त्यावेळी सांगितलं होतं. तसेच टाईम मॅगझिनने 2020 च्या 100 सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्येही बिलकीस बानो यांचा समावेश केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :