मुंबई : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने मिर्झापूर सीझन 2 चा ट्रेलर लॉन्च केला आहे. मिर्झापुरप्रमाणेच 'मिर्झापूर 2' देखील मसालेदार आणि रक्तरंजित खेळाने परिपूर्ण आहे. 'मिर्झापूर 2'च्या ट्रेलरमध्ये अली फजल म्हणजेच, मिर्झापूरचा गुड्डू पंडीत एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. तर कालीन भैय्यासोबत मुन्ना त्रिपाठी मिर्झापूरवर राज्य करत आहे. 'जो आया है, वो जाएगा भी। बस, मर्ज़ी हमारी होगी' या कालीन भैय्या यांच्या आवाजात मिर्झापूर 2 च्या ट्रेलरची सुरुवात होते. 'मिर्झापूर 2' मध्ये विजय वर्मासह अनेक नवी पात्र दिसत आहेत. तसेच पहिल्या सीझनमध्ये कालीन भैय्या ज्या आयपीएस ऑफिसरला भिती घालत असतात, त्याचं गुपित या ट्रेलरमध्ये उलगडण्यात आलं आहे.


पहिल्या सीझनच्या शेवटी मुन्ना भैय्या बबलु पंडीत आणि गुड्डू पंडीतच्या बायकोला गोळ्या घालून ठार करतो. त्याचाच बदला या सीझनमध्ये गुड्डू पंडीत घेणार आहे. तसेच त्याच्यासोबत श्वेताही बंदूकीसोबत खेळताना दिसून आली आहे. ट्रेलरमध्ये 'अब हमको बदला लेना है, और मिर्झापूर भी.', 'इस मिट्टी का उधार है हम पर, चुकाना है' आणि 'आप चाहते थे कि आपकी बेटी मिर्जापुर पर राज करे, बड़ी ना सही छोटी बेटी राज करेगी' अशा एकापेक्षा एक डायलॉग्सची चाहत्यांसाठी मेजवानी आहे.


पाहा ट्रेलर :



उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे 'मिर्झापूर'चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा अॅक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे. 'मिर्झापुर'च्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत.


'मिर्झापूर 2'मध्ये काय पाहायला मिळणार आहे. कालीन भैय्या यांचं वर्चस्व असणाऱ्या मिर्झापुरचं चित्र 'मिर्झापूर 2'मध्ये कसं असणार? हे पाहण्यासाठी चाहते गेले अनेक दिवस वाट पाहत आहेत. पण आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. आज सर्वात लोकप्रिय मिर्झापूर सीरीजचा पुढचा पार्ट 'मिर्झापूर 2'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. 'मिर्झापूर 2' मध्ये गुड्डू पंडित, कालीन भैय्या आणि मुन्ना भैय्या यांच्यावर भारी पडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.