Virat-Anushka Wedding Anniversary : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती. आज विरुष्का आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. यंदाचा लग्नाचा वाढदिवस दोघांसाठीही खूप खास आहे. कारण अनुष्का आणि विराटच्या घरी जानेवारीत चिमुकला पाहुणा येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यामुळे विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत अनुष्काला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने फोटो शेअर करत अनुष्कासाठी एक खास मेसेजही लिहिला आहे. दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट पॅटरनिटी लीव्हसाठी मायदेशी परतणार आहे.
विराट कोहलीची सोशल मीडिया पोस्ट :
विराट कोहलीने एक खास फोटो शेअर करताना अनुष्कासाठी एक मेसेजही लिहिला आहे. विराट म्हणाला आहे की, "तीन वर्ष आणि आयुष्यभरासाठी साथ..."
दरम्यान, दोघंही 2013 मध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. विराट आणि अनुष्काने सहा वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपली लग्नगाठ बांधली होती. आता दोघांनाही बाळ होणार आहे. जानेवारील दोघंही आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. विरुष्का म्हणजे, सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी कपल्सपैकी एक. दोघंही नेहमीच एकमेकांसोबत दिसून येतात. अनेकदा विराट कोहलीने बोलताना सांगितलं आहे की, अनुष्का त्याच्या आयुष्यात आल्यापासून तो एक चांगला माणूस बनला आहे.
विराट कोहलीचा समावेश जगभरातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत करण्यात येतो. तसेच अनुष्काचीदेखील बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आणि प्रोड्यूसर म्हणून ओळख आहे. काही दिवसांपूर्वी दुबईत पार पडलेल्या आयपीएलच्या सीझन दरम्यान अनुष्का विराटसोबत दुबईत होती. आयपीएलनंतर विराट तिथूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला तर अनुष्का भारतात परतली.