Vidyadhar Joshi :  आपल्या अभिनयाने, विनोदाच्या अचूक टायमिंगवर प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi ) उर्फ बाप्पा यांनी जीवघेण्या आजारावर मात केली. सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या शोमध्ये विद्याधर जोशी यांनी आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. फुप्फुसाशी संबंधित असलेला Interstitial lung disease (ILD) आजार झाल्यानंतर ते फुप्फुस प्रत्यारोपण दरम्यानचा अनुभव या मुलाखतीत विद्याधर जोशींनी सांगितला. अवयवदानाचे महत्त्वही त्यांनी या मुलाखतीत अधोरेखित केले.


जीवाची होतेय काहिली या मालिकेतून अचानक बाप्पांची एक्झिट झाली. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. बाप्पा जोशी हे नेमके कुठं गेले, मालिका का सोडली अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू होती. त्या प्रश्नांची उत्तरे अखेर विद्याधर जोशींनी दिलीत. बाप्पा जोशींनी सांगितले की, घरी येताना तीन मजले धावत यायचो, एक व्यायाम म्हणून मी हे करायचो. मात्र, कालांतराने आधीच्या तुलनेत खूप दमू लागलो. मात्र, हा दम मला वाढत्या वयामुळे येत असावे असे वाटत होते. मात्र, वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आजार समजला असल्याचे त्यांनी सांगितले. 


कोविडनंतर सतत आजारी, वैद्यकीय चाचणीत झाला उलगडा


विद्याधर जोशींनी म्हटले की, मला दोन वेळेस 15 दिवसांच्या अंतराने कोविड झाला. कोविडमधून बरा झाल्यानंतर खूप त्रास झाला. सतत ताप येऊ लागला, मग डॉक्टरकडून उपचार सुरू केले. नेमकं काय झालं असावं हे पाहण्यासाठी सीटी स्कॅन केले. त्यावेळी फुप्फुसावर जखमा दिसल्या, कोविडमुळे असावे असे वाटत होते. पण, एका डॉक्टरने ही जखम जुनी असल्याचे सांगितले. 


अखेर आजाराचे निदान झाले


वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर  मला फुप्फुसातील फायब्रॉसिस झालाय असे डॉक्टरांनी सांगितले. त्यातही मला Interstitial lung disease (ILD) या प्रकारातील आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेगवेगळ्या डॉक्टरांसोबत सल्लामसलत करत असताना  या आजारावर काहीच उपाय नसल्याचे समजले होते. या आजारातून बरे होणेदेखील कठीण असल्याची कल्पना डॉक्टरांनी दिली. हा आजार थांबवता येत नाही, कसा होतो याची कल्पना नाही नसल्याचे समजले असल्याचे विद्याधर जोशींनी सांगितले.  उपाय नसल्यावर मी आणि पत्नी दोघेजण घाबरलो होतो अशी कबुलीदेखील विद्याधर जोशी यांनी दिली. 


एका महिन्यात 43 टक्के फुप्फुस निकामी 


पहिल्या चाचणीत माझे फुप्फुस 13 टक्के निकामी झाल्याचे समोर आले. या आजारात फुप्फुस निकामी होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत जाते. फुफ्फुस चांगले ठेवण्यासाठी प्राणायाम, शंख वाजवणे सुरू केले होते. मात्र, काही दिवसांनी त्रास हळूहळू वाढू लागला. मालिकेच्या शुटिंगमध्ये खूपच त्रास वाढू लागला. त्यामुळे शूटिंग बंद केले. 


नोव्हेंबर महिन्यात डॉक्टरांना भेटलो होतो. डिसेंबर महिन्यात आम्हाला मुलाच्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी पॅरिसला  जायचे होते. पण, त्यावेळी त्रास वाढू लागला. 6 नोव्हेंबरला फुप्फुस 14 टक्के निकामी होते. याचे प्रमाण महिनाभरात वाढले आणि 43 टक्के फुफ्फुस निकामी झाल्याचे समोर आले. एका महिन्यात एवढा आजार बळावेल असं वाटले नव्हते असेही त्यांनी सांगितले. 


रुग्णालयात डॉक्टरांनी फुफ्फुस प्रत्यारोपण करावे लागेल असे सुचवले. त्यावर आम्ही होकार दर्शवला. त्यावेळी डॉक्टरांनी ही गोष्ट सोपी नसल्याचे सांगितले. देशात हैदराबादमध्ये ही शस्त्रक्रिया होते. त्यानंतर मुंबईत एक दोन रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. एका जवळच्या व्यक्तीने अवधूत गुप्तेच्या नातेवाईकांची ही शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. अवधूत या शस्त्रक्रियेची माहिती दिली. खर्चाची माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 


मी जगून काय करणार?


फुप्फुस प्रत्यारोपण करण्यासाठी एवढे पैसे माझ्यावर कशाला खर्च करताय, असा प्रश्न घरातील लोकांना केला. माझा समाजासाठी काय उपयोग आहे विचारले. त्यावर पत्नीने खूप समजावले आणि मी तयार झालो.आम्ही मेडिकल टीम तयार केली. यामध्ये डॉक्टर, जवळची लोक होती. आर्थिक नियोजन कसे असावे त्यावर आम्ही चर्चा केली. या आजाराबद्दल कुठंही गवगवा करायचा नाही अशी सूचना देण्यात आली.


ब्रश केल्यानंतरही प्रचंड धाप लागायची


15 डिसेंबरनंतर गोरेगावला पत्नीच्या भावाच्या घरी शिफ्ट झालो. ब्रश केल्यानंतरही दम लागायचा. टॉयलेट केल्यानंतर बेडवर येईपर्यंत प्रचंड दम लागायचा, काही दिवसांनी तर मला बाथरुमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर न्यावा लागायचा इतका आजार बळावला होता. एका रात्री 10.30 च्या सुमारास बर वाटत नव्हते. मला अॅडमिट व्हावं असे वाटत होते. नियोजनानुसार मला 1 जानेवारील अॅडमिट व्हायचे होते. पण, त्याआधीच प्रकृती ढासळू लागली. तीन पावलो चाललो आणि त्राण न उरल्याने कोसळलो. त्यावेळी शुद्धीवर होतो. त्यानंतर माझी थोडी शुद्ध हरपली होती. 


पत्नीचा भक्कम आधार 


रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी व्हेंटेलिटरवर ठेवण्याचा सल्ला दिला पण त्याला आपण तयार झालो नव्हतो असे विद्याधर जोशींची पत्नी वैशाली जोशी यांनी सांगितले. व्हेंटेलिटरवर ठेवणे म्हणजे आशा सोडल्यासारखं होते असे वैशाली जोशी यांनी सांगितले. पण, शरीरात पुरेसं ऑक्सिजन देण्यासाठी व्हेंटेलिटरवर ठेवण्यात आले होते असे त्यांनी सांगितले. माझ्या पत्नीने खूप प्रयत्न केले.सकारात्मक दृष्टीकोण ठेवला असल्याचे कौतुकोद्गार विद्याधर जोशींनी काढले.