Chhaava Movie Making: छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणारा 'छावा' (Chhaava Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. प्रत्येकाच्या मनावर 'छावा'नं जादू केली आहे. सध्या चित्रपट कमाईचा 500 कोटींचा आकडा गाठण्यापासून काही पावलं दूर आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल दिसून आला. तर, महाराणी येसूबाईंच्या (Maharani Yesubai) भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दिसली होती. तर, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) साकारली आहे. चित्रपट पाहताना प्रत्येक कलाकारानं मेहनत घेतल्याचं दिसून येतंय. अशातच 'छावा' रिलीज झाल्यापासून विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि अक्षय खन्नाच्या भूमिकेचं कौतुक होत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकलेल्या विक्की कौशलनं प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. तसेच, शंभू राजांना हालहाल करुन मारणाऱ्या क्रूर मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाच्या अभिनयाचंही चाहत्यांकडून कौतुक होत आहे. खरा खलनायक अक्षय खन्नानं साकारल्याचं सारेच म्हणत आहेत. अशातच 'छावा'च्या दिग्दर्शनाबाबत बोलायचं तर, लक्ष्मण उतेकरांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन, संवाद, पटकथा साऱ्याच बाजूंचं कौतुक होत आहे. पण, यासर्व गोष्टींमध्ये सर्वात जास्त कौतुक कसलं होत असेल तर ते म्हणजे, चित्रपटासाठी प्रत्येकानं घेतलेल्या मेहनतीचं आणि बारकाव्यांचं.
सध्या सोशल मीडियावर 'छावा'च्या मेकिंगचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. Hanuman Nadate Vlogs वरुन हा व्हिडीओ युट्युबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लढाईच्या सेटवरचाच आहे, आपले मावळे, संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला विक्की, मुघल सैनिक दिसत आहेत. नाही म्हटलं तरी हजारोंची गर्दी सेटवर पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी 'छावा'ची निर्मिती असलेल्या 'मॅडॉक'नंही शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना विक्की कौशललाही टॅग केलं आहे. युद्धाच्या सीनचे शूटिंग करण्यापूर्वी विक्की कौशलनं नक्की काय आणि कशी तयारी केली? हे या मेकिंगच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
"तू पूर्णपणे प्रशिक्षण घेऊन तयार होत नाहीस, तोवर शुटिंग नाही..."
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपट रुपेरी पडद्यावर आणण्यापूर्वी सर्वांकडूनच खूप मेहनत करुन घेतल्याचं स्पष्टपणे दिसतंय. तसेच, याबाबत खुद्द विक्की कौशलनंही मुलाखतींमधून स्पष्टता दिली होती. विक्की कौशलला छत्रपती संभाजी महाराज बनवणं असो किंवा लढाईतील सीन्सचे बारकावे, अक्षय खन्नाचा औरंगजेबाचा लूक असो किंवा मूळची साऊथची असलेल्या रश्मिकानं साकारलेली महाराणी येसुबाईंची भूमिका असो, प्रत्येक गोष्टीत लक्ष्मण उतेकरांनी बारकावे जपले आहेत. या चित्रपटाच्या सीन्समधला प्रत्येक सीन विक्की कौशलनं स्वतः केलेला आहे. कुठेही बॉडी डबलचा वापर केला गेलेला नाही, असं विक्कीनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं. तसेच, लक्ष्मण उतेकरांचा आग्रह होता की, मला माझ्या प्रेक्षकांना फसवायचं नाहीये, त्यामुळे जोपर्यंत तू पूर्णपणे प्रशिक्षण घेऊन तयार होत नाहीस, तोवर शुटिंगला सुरुवात करणार नाही, असं दिग्दर्शकांनी स्पष्टपणे सांगितल्याचंही विक्कीनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.
"आम्हाला विक्की कुठे दिसलाच नाही..."
'छावा'च्या मेकिंगचे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू ठेवला आहे. "तुझे कष्ट पडद्यावर दिसत आहेत...", "भावा तू संभाजी महाराज जगला...", "आम्हाला विक्की कौशल दिसलाच नाही, फक्त छत्रपती संभाजी महाराज दिसले, हीच तुमच्या मेहनतीची खरी पोचपावती...", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी मेकिंगच्या व्हिडीओवर केल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :