Vaishali Samant : आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची (Vaishali Samant) सध्या लगीनघाई सुरु आहे. तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना!! ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर वैशालीची ही लगीनघाई ‘कन्याकुमारी’ (Kanyakumari) च्या लग्नासाठी आहे. व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत ‘कन्याकुमारी’ या सोलो अल्बमसाठी वैशाली हिने आपला स्वरसाज दिला आहे. लवकरच हा अल्बम प्रकाशित केला जाणार आहे. अभिनेत्री दिशा परदेशी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.


‘कन्याकुमारी’च्या लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग या गाण्यातून छानपणे व्यक्त करण्यात आली आहे. मंदार चोळकर व मिताली जोशी यांनी लिहिलेल्या या गीताला वैशाली सामंत हिने आपल्या मधुर स्वरांनी चारचाँद लावले असून चिनार-महेश यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिचे नृत्यदिग्दर्शन या गाण्याला लाभले असून अमोल गोळेच्या छायांकनाने हे गाणं सजलं आहे.


‘कन्याकुमारी’ गाण्याबद्दल बोलताना वैशाली सांगते की, ‘मी याआधीही लग्नाची बरीच गाणी गायली आहेत  पण या गाण्याची खासियत म्हणजे नवरीच्या नखरेल अदा यातून खूप छान पद्धतीने आल्या आहेत. त्यामुळे हे गाणं गाताना तितकीच धमाल आली. हिंदी चित्रपटाला साजेसा भव्यपणा या गाण्यात पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही ‘कन्याकुमारी’ चे लग्न एन्जॉय करतील असं वैशाली सांगते.


हेही वाचा: