Aurangabad News: गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराची मागणी लक्षात घेत मंत्रीमंडळाच्या बैठकीत बुधवारी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र त्यावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी एमआयएमने गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. तर त्यांच्या याच इशाऱ्याला मनसेकडून उत्तर देण्यात आले आहे. एमआयएम विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असेल तर आम्ही सुद्धा संभाजीनगरच्या नावासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला आहे.
मनसेचा इशारा....
एमआयएमच्या इशाऱ्यानंतर उत्तर देतांना खांबेकर म्हणाले की, काल राज्याच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचं सर्व बाजूनी अभिनंदन होत असताना, खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर नावाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा केली. त्यामुळे या निमित्ताने जलील साहेबांना इतकच सांगू इच्छितो की, जर आपण रस्त्यावर आंदोलन करणार असाल तर या जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधव आणि मनसे संभाजीनगरच्या नावासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं उत्तर सुमित खांबेकर यांनी दिलं आहे. तसेच राजकीय नेत्यांवर टीका करताना जलील यांनी आपण एक लोकप्रतिनिधी आहे हे विसरू नयेत असेही खांबेकर म्हणाले.
वकिलांची फौज उभी करणार: जलील
जलील यांनी औरंगाबादच्या दारू सलाम येथील कार्यालयात कार्यकर्त्यांची घेतलेल्या बैठकीत बोलताना म्हणाले की, औरंगाबादमध्ये येऊन विकासाच्या मुद्यावर बोलणारे उद्धव ठाकरे सत्ता जात असल्याच कळताच औरंगाबादच नाव बदलून गेले. तर नामांतराचा श्रेय आपल्याला मिळावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी जाता-जाता हा निर्णय घेतला असून, त्यांना संभाजीराजेंबद्दल कोणतेही प्रेम नसल्याचं जलील म्हणाले. तसेच या निर्णयाला विरोध करण्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरू आणि न्यायालयीन लढाईसाठी वकिलांची फौज उभा करणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. सोबतच लोकसभेत सुद्धा आपण हा मुद्दा मांडणार असल्याचं जलील म्हणाले. त्यामुळे पुढील काळात औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.