Houn Jau De Song : मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) या मराठी चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 24 तासांत या गाण्याने 2 मिलियन्स अर्थात 20 लाख व्हूयुजचा टप्पा पार करत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. मनाला भिडणारी शब्दरचना आणि संगीताचा सुमधुर ठेका याने सजलेल्या या गाण्याला बॉलिवूड संगीतकार मनन शाह यांनी सुरेल संगीताची किनार जोडली आहे.
जय अत्रे यांनी लिहिलेलं ‘होऊन जाऊ दे’ हे धमाकेदार गाणं गायक आदर्श शिंदे आणि सौरभ साळुंखे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल या युवा अभिनेत्यांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. दोन मित्रांची धमाल केमिस्ट्री या गाण्यातून पहायला मिळतेय. दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा या चित्रपटातून पहाता येणार आहे.
पाहा गाणे :
काय आहे चित्रपटाचं कथानक?
सध्याच्या जगात मैत्रीची व्याख्या जरी तीच असली तरी तीचं स्वरुप बदलताना दिसतंय. या चित्रपटातूनही मैत्रीमधला वेगळा विचार आपल्या समोर येणार आहे. दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत.
तरुणाईला डोळ्यासमोर ठेवलं!
या गाण्याच्या यशाबद्दल बोलताना संगीतकार मनन शाह म्हणतात की, आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून हे गाणं तयार करण्यात आलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं एक ख़ास स्थान असतं. या गाण्यातून प्रत्येकजण आपल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देईल. हे गाणं प्रत्येकाला कनेक्ट होईल अशा रीतीने आम्ही ते तयार केलं. त्याला मिळालेलं यश त्याचीच पावती आहे.
‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलीवूडमधील अनेक हिट गाणी दिल्यानंतर आता मराठीच्या संगीत क्षेत्रातल्या पदार्पणातही त्यांच्या ‘होऊन जाऊ दे’ गाण्याने कमाल केली आहे. 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची धुराही मनन शाह यांनी स्वत: सांभाळली असून, चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांचे आहे. ‘एस एंटरटेन्मेंट’ बॅनरखाली 'रूप नगर के चीते' 16 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या