Uddhav Thackeray On Dashavatar Movie: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) दिलीप प्रभावळकरांचा (Dilip Prabhavalkar) 'दशावतार' सिनेमा (Dashavatar Movie) धुमाकूळ घालतोय. या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. मुळचा कोकणातल्या (Konkan News) कथेवर आधारित असलेला हा सिनेमा मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या सिनेमाची भूरळ सर्वसामान्यांपासून अगदी राजकीय नेते मंडळींना पडली आहे. अशातच उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले होते. तसेच, सिनेमा पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले दिलीप प्रभावळकर आणि सिनेमाच्या अख्ख्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'दशावतार' सिनेमाबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "एका शब्दांत सांगायचं तर, अफलातून पिक्चर आहे, अप्रतिम आहे. बऱ्याच वर्षांनंतर मी पूर्ण चित्रपट पाहिला, ज्यात सर्व गोष्टी परिपूर्ण आहेत. पहिल्या क्षणापासून कथानक जी पकड घेतंय, ते शेवटपर्यंत काही सुटत नाही. मनापासून सांगतो की, मी बऱ्याच वर्षानंतर परिपूर्ण चित्रपट पाहिला."
'दशावतार' परिपूर्ण चित्रपट...: उद्धव ठाकरे
"दिलीप प्रभावळकरांबाबत बोलायचं तर, त्यांच्या अभिनयाबाबत आपण कित्येक वर्ष पाहतोय, तुमची एक मुलाखत पाहिली, त्यात त्यांनी म्हटलंय की, त्यांना सारेजण म्हणतात की, तुम्ही या वयात असं काम करू शकता... पण मी उलटं म्हणीन की, तुम्ही या वयात जर असं काम करू शकता, तर आणखी पुढे जाऊन काय कराल... खरंच विश्वास बसत नाही, संपूर्ण टीमनं, कुठेच काही कमी काढण्यासारखं काहीच नाही... म्हणून मी म्हटलं ना की, परिपूर्ण चित्रपट आहे.", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत : उद्धव ठाकरे
'दशावतार' या चित्रपटाची कथा जरी कोकणातील असली तरी व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज आपण कुठे आहोत, नी कुठल्या दिशेने चाललो आहोत, हे वेळीच ओळखलं नाही तर आपण एका कडेलोटाच्या टोकावर आहोत, हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. सगळ्यांचीच कामं उत्तम आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवलंय ते अद्भुत आहे. सुबोध खानोलकर या तरूण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय. अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा 'दशावतार' चित्रपटाची प्रशंसा केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 'दशावतार' चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धवजींसह शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत ,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले, मिलिंद गुणाजी, राणी गुणाजी,अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दशावतार चित्रपट पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब लावली हजेरी