Rajya Natya spardha: सध्या राज्यभरात सुरू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेवर संघ आणि भाजपचं (Bjp) अतिक्रमण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं (Nationalist Congress Party) केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागानं सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या राज्यात 19 केंद्रांवर राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहेत.  स्पर्धेत अनेक ठिकाणी समन्वयक आणि परीक्षक म्हणून भाजप आणि संघाशी संबंधित 'संस्कार भारती'ची माणसं असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.


अहमदनगर केंद्रावर परिक्षक असलेले पिंपरी चिंचवडचे नरेंद्र आमले, नागपूर केंद्रावरच्या परिक्षक असलेल्या सुषमा कोठेकर या भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या पदाधिकारी असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला आहे. राष्ट्रवादीकडे अनेक स्पर्धकांच्या तक्रारी आल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी 'माझा'ला दिली. नगर केंद्रावर नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची महती सांगणारी नाटकं सादर झाल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. 


महाराष्ट्रात 15 नोव्हेंबरपासून 61 वी राज्यनाट्य स्पर्धा
महोत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 मध्ये या स्पर्धांची सुरूवात केली. या नाट्य महोत्सवानं आतापर्यंत महाराष्ट्रातील हजारो हौशी आणि व्यायसायिक कलाकारांना रंगभूमीसह चित्रपटांमध्ये संधी दिली आहे. गेली 61 वर्ष दरवर्षी ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. यावर्षी राज्यातील तब्बल 19 केंद्रांवर होत असलेल्या या स्पर्धेत हजारों कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ सहभाग घेत आहेत.


काय आहेत राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे आरोप? 


यासंदर्भात राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागानं राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, राज्यात 2014 मध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यापासून गेल्या सात-आठ वर्षांत या स्पर्धेच्या संयोजनात भारतीय जनता पक्ष आणि संघाशी संबंधित 'संस्कार भारती'च्या माध्यमातून प्रचंड हस्तक्षेप होत आहे. प्रारंभी 'संस्कार भारती'कडून स्पर्धेच्या परिक्षकांची सूची संचालनालयास पाठवली गेल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. भाजपच्या मर्जीतील,विचारधारा मानणारे व कार्यकर्ते अशांची नेमणूक परीक्षकपदी करून त्यांच्या विचारधारेच्या 'नाटकांना, स्पर्धकांना पारितोषिके देण्याबाब प्रयत्न केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागानं केला आहे. यातून भाजप आणि संघविरोधी विचारधारा मांडणाऱ्या नाटकांना व स्पर्धकांना डावलल्याचा आरोप बाबासाहेब पाटील यांनी केला. यातून नियोजित पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचपुरोगामी विचारांची मांडणी
असलेल्या नाटकांचे खच्चीकरण करण्याची विचारधारा  अंमलात आणली जात असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. 


अनेक ठिकाणी स्पर्धेचे समन्वयक आणि परिक्षक भाजप-संघाचे : राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग


शासनाच्या सांस्कृतिकार्य संचालनालयाने राज्यभरातील केंद्रांवर नियुक्त केलेले स्पर्धा समन्वयक बदलण्याचे प्रयत्न  करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. स्पर्धा अगदीच तोंडावर आल्याने हा प्रयत्न पूर्णतः यशस्वी झाला  नसल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. अशा ठिकाणी भाजपप्रणित उपसमन्वयक नेमण्यात आल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. अहमदनगर केंद्रावर परिक्षक असलेले पिंपरी चिंचवडचे नरेंद्र आमले, नागपूर केंद्रावरच्या परिक्षक असलेल्या सुषमा कोठेकर या भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या पदाधिकारी असल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला आहे. 


पुढील वर्षी राज्यभरातील सर्व समन्वयक, परीक्षक भाजप प्रणित ठेवण्याचा घाट भाजपाने घातल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. आगामी एक-दोन महीन्यात रंगभूमी व चित्रपट परिनिरीक्षण, मंडळ, नाटक व चित्रपट सेन्सॉर, व्यावसायिक व प्रायोगिक नाट्य अनुदान समिती इत्यादी ठिकाणी अशासकीय सदस्य पदी भाजपच्याच विचारसरणीची माणसे विविध विभागामार्फत निवडल्या जाणार असल्याची शक्यता राष्ट्रवादीनं व्यक्त केली आहे. 


याविरोधात आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा:


'आपल्याला न पटणारी विचारधारा मांडूनच दयायची नाही, कोणी विचारधारा मांडलीच तर ती विचारधारा, स,ती मांडणारी संस्था व प्रसंगी विचार मांडणारा व्यक्ती संपविण्याचा कुटील,व सनातनी डाव  भाजप खेळते आहे, असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. भाजपच्या सरकारचा या कलाक्षेत्रातील वाढत्या हस्तक्षेपाचा राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागानं निषेध केला आहे. शासनाने हा मनमानी व हुकुमशाही कारभार त्वरीत थांबवावा, अन्यथा याविरुद्ध राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी चित्रपट, व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Madhurav : 'मधुरव - बोरू ते ब्लॉग'; सोशल मीडियावर गाजलेला अनोखा प्रयोग आता रंगभूमीवर