Purushottam Karandak Pune : पुरुषोत्तम करंडक (Purushottam Karandak) या नाट्य स्पर्धेत विविध एकांकिका सहभागी होतात. या स्पर्धेचं पुण्यातील (Pune) तरुणाईला आकर्षण असतं. 1963 सालापासून महाविद्यालयीन स्तरावर पुरुषोत्तम करंडक ही नाट्य स्पर्धा महाराष्ट्रीय कलासोपक संस्थेतर्फे आयोजित  करण्यात येते. महाराष्ट्रातील तरुणाईच्या नाट्यगुणांना वाव देणाऱ्या प्रमुख स्पर्धांमध्ये पुरुषोत्तम करंडकाचा समावेश होतो. मात्र स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय परीक्षकांना आढळून आलेला नाही. त्यामुळे यंदा स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. पुणे इन्स्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या कलिगमन या एकांकिकेस सांघित पुरस्काराचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. 


एकही एकांकिका करंडक देण्याच्या योग्यतेची नसल्यानं घेतला निर्णय


पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत एकही एकांकिका परीक्षकांना करंडक देण्याच्या योग्यतेचे आढळलेली नाही. त्यामुळे यावर्षी फक्त सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  त्याचबरोबर यावर्षी सर्वोत्तम अभिनय नैपुण्य हा पुरस्कार देण्याच्या योग्यतेचा एकाही कलाकाराचा अभिनय आढळून आलेला नाही असं म्हणत परीक्षकांनी हा पुरस्कार देखील यावर्षी रद्द केलाय.  त्याचबरोबर प्रायोगिक एकांकिका आणि सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय हे आणखी दोन पुरस्कार देखील यावर्षी देण्यात येणार नाहीत. कारण या पुरस्कारांच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय या स्पर्धेत आढळून आलेला नाही.  


यंदा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचं परीक्षण परेश मोकाशी, हिमांशु स्मार्त आणि पौर्णिमा मनोहे यांनी केले होते. ही स्पर्धा 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन 23 सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे करण्यात आलं आहे. 


पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या या स्पर्धेनं मराठी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकार दिले आहेत. त्यामध्ये सुबोध भावे, तेजस बर्वे, प्रियांका बर्वे, आलोक राजवाडे, सारंग साठे, पर्ण पेठे, गिरीजा ओक यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये नवोदित कलाकारांना त्यांचा अभिनय सादर करण्याची संधी मिळते. या स्पर्धेतील एकांकिता पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: